 
        
        संग्रहित फोटो
इस्लामपूर : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शदर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. इस्लामपूर नगरपालिका निवडणूक शरद पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढवणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.
इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्ष पदासाठी आम्ही ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष आनंदराव मुलगुंडे यांचे नाव एकमताने निवडले आहे. नगरपालिका निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावर लढवणार आहोत. महाविकास आघाडीच्या सहकारी घटक पक्षांबरोबर आमचे शहराध्यक्ष संपर्कात आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करून अध्यक्षपदाचा उमेदवार एकमताने ठरवला असल्याची माहिती आमदार जयंत पाटील यांनी दिली. यावेळी शामराव पाटील, धैर्यशील पाटील उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले,” शहरातील प्रत्येक नागरिकाला हवासा वाटणारा असाच आमचा उमेदवार आहे. नगरपालिकेच्या राजकारणात ३५ वर्षांहून अधिक काळ ते नगरपालिकेच्या राजकारणात कार्यरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह विकास आघाडीतील शिवसेना व काँग्रेसच्या सोबत पार्टीच्या शहराध्यक्षांची चर्चा सुरू आहे. आम्ही पालिका निवडणूक जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले,” शहरातील १५ प्रभागातील मतदारांना आपल्याच प्रभागात मतदान करता यायला हवे. पण काहींची नावे दुसऱ्याच प्रभागात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत आम्ही हरकती नोंदवल्या आहेत. मोठ्या संख्येने मतदार वेगळ्या प्रभागात असल्याची गंभीर बाब आहे, याबाबत आम्ही तक्रार केली आहे.”






