
फोटो सौजन्य: Gemini
शिराळ (ता. पाथर्डी) परिसरात वादळी वारे आणि मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले. या नैसर्गिक संकटामुळे हाता-तोंडाशी आलेला कांदा, मका, गहू, संत्रा, डाळिंब, आंबा आणि टरबूज यांसारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरांवरील पत्रे उडाले असून, वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारांच्या पावसामुळे शिराळ परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुळे, झाडे, गोरे, तागड आणि पाथरकर वस्तीवरील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पूर्णपणे भुईसपाट झाली आहेत.
यामध्ये प्रामुख्याने कांदा, गहू, डाळिंब आणि संत्रा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीमध्ये बाधित शेतकरी शरद मुळे यांचा कांदा, डाळिंब, गहू, लिंबू पिकांसह सौर ऊर्जा प्रकल्पाचे (सोलर) मोठे नुकसान झाले, रमेश पाथरकर यांचे कांदा, कारले आणि टोमॅटो पिकांचे, मिटू मुळे यांचे राहत्या घरावरील पत्रे उडाले, कांदा पिकाचे नुकसान झाले. रामदास गोरे यांचे टरबूज, डाळिंब आणि कांदा पिके होत्याची नव्हते झाली. संभाजी गोरे, अनिल झाडे, महेश चेमटे यांच्या कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. युवा नेते व राहुरी पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांनी तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनाकडून सध्या प्रत्यक्षात पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
पारनेर (वा.) तालुक्याच्या उत्तर भागात निसर्गाने थैमान घातले आहे. वासुंदे, पळशी, वनकुटे, खडकवाडी आणि वडगाव सावताळ परिसरात बुधवारी सायंकाळी उशीरा बेभान वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीत पिके तर गेलीच, मात्र अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले आहेत. घरावरील पत्रे उडणे, विजेचे खांब कोलमडणे आणि शेती पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या गारपिटीतून शेतकरी सावरत असतानाच पुन्हा एकदा निसर्गाने घाला घातला. वासुंदे परिसरातील बोकनकवाडी, शिक्री, खडकवाडीतील जांभळवाडी तसेच पळशीतील चिमणीबारव भागात वाऱ्याचा वेग भयानक होता. प्रामुख्याने कांदा, मिरची, झेंडू, टरबूज, डाळिंब, गहू आणि आंबा या पिकांचे नुकसान झाले आहे.
उन्हाळ्यासाठी साठवून ठेवलेला ज्वारी आणि बाजरीची वैरण पावसात भिजल्याने कुजण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. जोराच्या वादळामुळे अनेक भागांत घर आणि गोठ्यांवरील पत्रे कागदासारखे उडाले. वासुंदे येथील बबन बोरुडे यांच्या घराचे पत्रे उडाल्याने त्यांचा संसार रस्त्यावर आला आहे. बन्सी गोवर्धन राठोड यांच्या घरावर झाड कोसळले, राजेंद्र शिरतार आणि विठ्ठल जेडगुले यांचे घर व जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले आहे. पळशी येथील राघू सोमा मधे आणि बाबाजी किसन जाधव यांची घरे पडली. खडकवाडीत राघू केदार, पोपट केदार, बुवाजी जाधव आणि शंकर केदार यांच्याही घरांचे अतोनात नुकसान झाले.