
फोटो सौजन्य: iStock
पुणतांबे गावाला कालव्याच्या आवर्तनाचा कालावधी वाढल्यामुळे पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. रस्तापूर येथील पर्यायी योजनेवरून पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन न झाल्याने गावकऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गोदावरी उजवा कालवा हा पुणतांबा परिसरासाठी टेल भाग असल्याने गावातील दोन साठवण टाक्यांवर अवलंबून पाणीपुरवठा केला जातो. मात्र वर्षातून काहीवेळा, विशेषतः उन्हाळ्यात, आवर्तनाचा कालावधी वाढत असल्याने पाणीटंचाई ओढवते.
ही समस्या दूर करण्यासाठी सुमारे दहा-पंधरा वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या पुढाकारातून रस्तापूर येथे गोदावरी नदीकिनारी विहीर आणि जलवाहिन्या उभारून पर्यायी योजना तयार करण्यात आली होती. परंतु या पर्यायी योजनेकडे ग्रामपंचायतीकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. सध्या देखील योजनेचा योग्य वापर न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
ग्रामपंचायत सदस्य अनिल नळे, भूषण वाघ, रामचंद्र पवार, सुनील थोरात व इतर सदस्यांनी तातडीच्या उपाययोजनेत म्हणून पाणी योजनेजवळ कुपनलिका घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन ‘प्रस्ताव पाठवावा लागेल’, ‘खर्चाची मंजुरी घ्यावी लागेल’ अशा कारणांमुळे निर्णयाला टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे.
गेल्या चार-पाच महिन्यांपासून गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाल्याने परिसरातील विहिरींच्या पातळीतही मोठी वाढ झाली आहे. तरीही नदीकाठी असलेल्या गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. “नदी उशाला आणि घसा कोरडा” ही म्हण अक्षरशः खरी ठरत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
रस्तापूरच्या पर्यायी योजनेवरून तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी होत आहे. तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा ही योजना कायमस्वरूपी कार्यरत ठेवून भविष्यात टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने ठोस प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.