पुण्यात पार पडला 'युनिसेफ'चा इव्हेंट (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुण्यात पार पडले ‘युनिसेफ’चे वर्कशॉप
भारतात दरवर्षी अपघातामुळे दीड लाखांपेक्षा जास्त मृत्यू
तरूण वाहनचालकांमध्ये हेल्मेट वापरण्याचे प्रमाण कमी
पुणे: रस्ते सुरक्षा, आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी ‘युनिसेफ’तर्फे पत्रकारांसाठी राज्यस्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन पुणे शहरात करण्यात आले होते. त्यामध्ये रस्ते सुरक्षा या विशेष सत्रात भारतात दरवर्षी १ लाख ५० हजारहून अधिक रस्ते अपघातातील मृत्यू होतात. यात मुले आणि तरुण यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
२०२४ मध्ये महाराष्ट्रात एकूण ३६,०८४ रस्ते अपघात आणि १५,३३५ मृत्यू नोंदवले गेले. म्हणजे दररोज सरासरी ९९ अपघात आणि ४३ मृत्यू होतात. एकूण मृत्यू संख्येनुसार महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ३७ टक्के अपघात राष्ट्रीय महामार्गांवर होतात. तर, ६५ टक्के पेक्षा अधिक अपघात अतिवेगामुळे घडतात. देशातील अपघाताने होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ११ टक्के मृत्यू हे बालक आणि किशोरवयीन आहेत. तरुण वाहन चालकांमध्ये हेल्मेट वापराचे प्रमाण केवळ २९ टक्के इतके कमी आहे हे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
रस्ते सुरक्षा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग या किशोरवयीन आरोग्याच्या बदलते प्राधान्यक्रमाविषयी जनजागृती वाढवण्यासाठी माध्यमांनी अधिक सक्रिय सहभाग घ्यावा, पुराव्यावर आधारित वृत्तांकनासाठी आवश्यक चौकस मुल्यांकन कौशल्य आणि किशोरवयीन आरोग्याविषयी नियोजनबद्ध प्रभावी वार्तांकन करण्यावर भर देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या माजी कुलगुरू आणि युनिसेफच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मृदुला फडके,युनिसेफच्या पोषण तज्ज्ञ राजलक्ष्मी नायर, एकात्मिकबाल विकास सेवा योजनेच्या सहाय्यक आयुक्त संध्या नगरकर, यांनी ‘किशोरवयीन पोषण आणि संतुलित आहार: संधी आणि अंमलबजावणी’ या विषयावर आपले विचार मांडले.
युनिसेफ महाराष्ट्रचे प्रमुख संजय सिंग यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केली. युनीसेफचे आरोग्य तज्ज्ञ मंगेश गधारी म्हणाले, “लसीकरण करून प्रतिबंध करता येणारा असा गर्भाशयाच्या मुखाचा हा एकमेव कर्करोग आहे. प्रतिबंधासाठीची पहिली आणि सर्वात प्रभावी पायरी म्हणजे जनजागृती. महिलांना उपचार मिळवण्यापासून रोखणाऱ्या गैरसमजांना आव्हान देण्यात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. गर्भाशयाच्या आरोग्या बाबत असलेले संकोच दूर करून सामूहिक हिताच्या विषय म्हणून मांडणी केल्यास पत्रकार जीवनदायी माहिती सर्वदूर पोहोचवू शकतात.”
कोणताही रस्ता अपघात अपरिहार्य नसतो. माध्यमे रस्ते सुरक्षेविषयी संवादाला दिशा देऊ शकतात. केवळ अपघातावर शोक व्यक्त करण्याऐवजी माध्यमं प्रतिबंध, जबाबदारी आणि उत्तरदायी शासन यावर सातत्यपूर्ण चर्चा घडवू शकतात. रस्ते सुरक्षेवरील वृत्तांकनामध्ये पुरावे, अंमलबजावणी आणि न्याय यांचा ठळकपणे उल्लेख करून पत्रकार धोरणकर्त्यांची बांधिलकी अधिक मजबूत करु शकतात, असे आवाहन युनीसेफचे दिल्ली स्थित आरोग्य तज्ज्ञ डॉ. सय्यद हुब्बे अली यांनी केले.






