अहमदनगर : लोकसभा निवडणूक पार पडून त्यांचा निकाल लागला असला तरी राजकारण थांबण्याचे नाव घेत नाही. अहमदनगरमध्ये लोकसभा निवडणुकीची व प्रचाराची रणधुमाळी दिसून आली. महायुतीकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली होती. निकालानंतर निलेश लंके यांनी विजयी गुलाल उधळला. मात्र आता सुजय विखे पाटील यांनी फेरमतमोजणीची मागणी केलेली आहे.
सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या निकालाची फेरमतमोजणीची मागणी केली आहे. यासाठी सुजय विखे पाटील यांनी तब्बल 18 लाख रुपये निवडणूक आयोगाकडे जमा केले आहेत. त्यामुळे निलेश लंके यांच्या चिंता वाढणार आहेत. यामुळे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा निर्णय बदलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुजय विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केल्यामुळे ही फेरमतमोजणी करत असल्याचे सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे. 5 नगर शहर, 5 राहुरी मतदारसंघ, शेवगाव पाथर्डी 5, कर्जत जामखेड 5 तर पारनेर आणि श्रीगोंदा मतदार संघातील 10 इव्हीएम मशीनचा यामध्ये समावेश आहे. 40 बूथवरील मायक्रो कंट्रोल युनिट आणि VVPAT ची फेर मतमोजणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ईव्हीएमवर शंका नाही मात्र कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर मागणी केल्याचे सुजय विखे यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी निवडणुक आयोगाची नियमित रक्कम तब्बल 18 लाख 88 हजार शुल्क भरून त्यांनी आयोगाकडे ही मागणी केली आहे.
राजकारणामध्ये पराभव देखील मान्य करावा
याबाबत प्रतिक्रिया देताना विद्यमान खासदार निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील खडेबोल सुनावले आहेत. निलेश लंके म्हणाले, आता तरी पराभव मान्य करा. सत्तेतील माणसं निवडणूक आयोगावर आक्षेत घेत असेल तर ही चुकीची बाब आहे. तुम्हाला पराभव मान्यच होत नसल्याने ही चुकीची बाब आहे. शेवट राजकारणामध्ये पराभव देखील मान्य करायला शिकलं पाहिजे. अनेक निवडणुकांमध्ये आक्षेप घेतला गेला मात्र नंतर एकही मताचा फरक पडत नाही. त्यामुळे पराभव झाला असल्याच आतातरी मान्य करा. अशी टीका निलेश लंके यांनी केली आहे.