सातारा बांधकाम विभागातील अजय देशपांडे, निलेश कोहाळे यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार
मेढा / दत्तात्रय पवार : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते, पूल, शासकीय इमारती तसेच विविध महत्त्वाची सार्वजनिक बांधकामे आणि विकास प्रकल्प राबवले जातात. या प्रकल्पांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि दर्जा राखण्यासाठी बांधकाम क्षेत्रातील अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आपल्या तांत्रिक कौशल्याचा आणि प्रशासकीय अनुभवाचा प्रभावी वापर करून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांचा राज्य शासनामार्फत दरवर्षी वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यावर्षी सातारा सार्वजनिक बांधकाम विभागातील अजय देशपांडे आणि निलेश कोहाळे यांची उत्कृष्ट अभियंता पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
सध्या फलटण येथे उपअभियंता म्हणून कार्यरत असलेले अजय देशपांडे तसेच सातारा सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत असलेले निलेश कोहाळे यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य सरकारकडून ‘उत्कृष्ट अभियंता’ म्हणून गौरविण्यात येणार आहे. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर हा दिवस देशभर ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष कार्यक्रमात या दोन्ही अधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
तापोळा केबल स्टे ब्रिजच्या कामात देशपांडे यांचे योगदान अजय देशपांडे यांनी महाबळेश्वर येथे उपअभियंता म्हणून कार्यरत असताना तापोळा येथील शिवसागर जलाशयावरील केबल स्टे ब्रिजच्या कामकाजाची प्रभावीपणे जबाबदारी सांभाळली. या प्रकल्पामुळे दुर्गम भागातील दळणवळणाला मोठी चालना मिळाली असून, जिल्ह्यातील पहिला केबल स्टे ब्रिज म्हणून या पुलाची विशेष ओळख निर्माण झाली आहे.
अभियांत्रिकीच्या दृष्टीने आव्हानात्मक असलेल्या या प्रकल्पात तांत्रिक बाबी, बांधकामाचा दर्जा, सुरक्षितता तसेच कामाची अंमलबजावणी याकडे देशपांडे यांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्या तांत्रिक कौशल्याची आणि प्रशासकीय क्षमतेची दखल घेत त्यांची उत्कृष्ट अभियंता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
निलेश कोहाळे यांची उल्लेखनीय कामगिरी
निलेश कोहाळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत असताना विविध बांधकाम प्रकल्पांमध्ये जबाबदारीने काम केले आहे. मेढा बांधकाम उपविभागातही त्यांनी आपल्या कार्यक्षमतेची छाप उमटवली. विशेष म्हणजे सेवेला सुरुवात करून काही वर्षांचा कालावधी पूर्ण होत असतानाच उत्कृष्ट अभियंता पुरस्कारासाठी त्यांची झालेली निवड ही त्यांच्या कार्याची विशेष दखल मानली जात आहे.
एक मानाचा तुरा रोवला जाणार
अजय देशपांडे आणि निलेश कोहाळे यांच्या उत्कृष्ट अभियंता पुरस्कारासाठी झालेल्या निवडीबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच बांधकाम क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत असून, अभियंता दिनाच्या निमित्ताने सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात या दोन्ही अधिकाऱ्यांनी आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.






