‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा
आजपासून मुंबईत पोहोचेपर्यंत सरकारकडे वेळ असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले. मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारला तयारीची संधी देत असून ही चौथी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री अंतरवाली सराटीत येऊन मराठा समाजाच्या मागण्यांबाबत भूमिका स्पष्ट करू शकतात, असेही ते म्हणाले.
मनोज जरांगेंच्या आंदोलनावर संजय राऊत यांनी केलं मोठं विधान; म्हणाले…
दरम्यान, मुंबईकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे राजकीय परिणाम होतील, असा इशारा त्यांनी दिला. “मुंबईत येण्यापासून मराठ्यांना रोखल्यास भाजपपासून मतदान लांब गेले म्हणून समजा,” असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
मराठा आरक्षणासाठी मुंबईत निर्णायक आंदोलन करण्याची घोषणा करताना जरांगे पाटील भावूक झाले. बोलताना त्यांना हुंदका फुटला आणि डोळ्यांत अश्रू आले. आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारला अनेक संधी दिल्या, मात्र आता मुंबईत आंदोलनासाठी जाण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. ही लढाई शेवटची आणि निर्णायक असल्याचा दावा करत त्यांनी समाजबांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. घरात न थांबता या लढ्याचे साक्षीदार व्हा आणि आंदोलनाच्या मार्गावर एकत्र या, असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबईकडे जाताना तसेच आंदोलनानंतर परत येईपर्यंत संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले पाहिजे, अशा स्पष्ट सूचना जरांगे पाटील यांनी समर्थकांना दिल्या. कोणत्याही परिस्थितीत दंगा, दगडफेक किंवा जाळपोळ करू नका, असे आवाहन त्यांनी केले.
मराठा आरक्षणाच्या अंतिम लढ्यासाठी जरांगे पाटील यांनी मुक्काम करत मुंबईत पोहोचण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे, त्यानंतर अहिल्यानगरमधील श्रीगोंदा, तिसरा मुक्काम पुण्यातील हडपसर, तर चौथा मुक्काम रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे असणार आहे.
त्यानंतर मराठा आंदोलक मुंबईत दाखल होणार असून सकाळी १० वाजता आझाद मैदानावर आंदोलन सुरू करण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे. आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
आरक्षणाच्या मागण्यांवर सरकारने मुंबईत पोहोचण्यापूर्वी निर्णय घ्यावा, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात सरकार मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत कोणती भूमिका घेते आणि जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाबाबत प्रशासन काय नियोजन करते, याकडे लक्ष लागले आहे.






