बारामती – आज तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीच्या प्रचार तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराचा धुरळा उडालेला आहे. बैठका आणि सभा यांचा धडाका सुरु झाला आहे. अजित पवार यांची आज डोरलेवाडी येथे सभा पार पडली. यावेळी अजित पवार यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच महादेव जानकर यांनी बारामतीमध्ये 2014 च्या निवडणूकीमध्ये दिलेल्या लढतीची आठवण करुन देत सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाकडे यंदा संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे. पवार कुटुंबातील दोन्ही उमेदवार असून नणंद विरुद्ध भावजय अशी लढत रंगणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यामध्ये राजकीय लढत होताना दिसत आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी देखील अनेक बड्या नेत्यांच्या प्रचार सभा होणार आहेत. डोरलेवाडी येथील सभेमध्ये अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधत त्यांना महादेव जानकर यांनी दिलेल्या चुरशीच्या लढतीची आठवण करुन दिली आहे.
अजित पवार म्हणाले, “मला खडकवासलातील लोकांनी सांगितलं, दादा महादेव जानकर यांनी २०१४ च्या निवडणुकीत कमळ चिन्ह घेतलं असतं तर, सुपडा साफ झाला असता. कारण, खडकवासल्यामधील मतदारांना कपबशी हे जानकर यांचं चिन्ह आहे, हे माहिती नव्हतं. मात्र, यावेळी मतदारांच्या सर्व माहित असून त्यांनी जानकर यांचं शिट्टी चिन्ह लक्षात ठेवलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी परभणीत आल्यावर जानकर यांचा हात धरून आपला छोटा भाऊ आहे असं म्हटलं. त्यामुळे जनतेला शिट्टीला मत म्हणजे कमळाला मत असं लक्षात आले,” असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.