
अजित दादांची वस्त्रनगरीशी जवळीक
इचलकरंजी : हजरजबाबी, स्पष्ट वक्तेपणा आणि सडेतोड निर्णय घेणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच वस्त्रनगरीवर शोककळा पसरली. अजितदादांच्या इचलकरंजी भेटीच्या आठवणींना वाट करुन देत अनेकांनी उजाळा दिला. आमदार राहुल आवाडे यांनी सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ व त्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता आज आपल्यातून हरपला असल्याचे म्हटले आहे. तर माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी, अजितदादा हे परिणामांची तमा न बाळगता स्पष्टपणे निर्णय घेणारे नेते होते, असे म्हटले आहे.
राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री झालेले अजितदादा इचलकरंजीत काही कार्यक्रमांच्या निमित्ताने आले होते. २०२४ च्या विधानसभा निवडणूकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षात फूट पडल्यानंतर इचलकरंजीत ते नव्याने स्थापन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले होते. त्याचबरोबर मार्च २०२५ मध्ये शहरात भरलेल्या कै. भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभासाठी ते आवर्जून उपस्थित राहिले होते. त्याचवेळी त्यांनी महानगरपालिकेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीची ग्वाही दिली होती. त्याच अनुषंगाने महानगरपालिकेचा थकीत जीएसटी परतावा देण्याबाबत त्यांनी निर्णय घेतला होता.
हेदेखील वाचा : Ajit Pawar Death : आज माझा हा प्रवास इथेच थांबतोय…! अजित पवारांचा अखेरचा निरोप, तो AI जनरेटेड VIDEO पाहून हृदय पिळवटेल
याशिवाय श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी सांगता समारंभास नामदार अजितदादा उपस्थित होते. अजितदादांच्या निधनाचे वृत्त समजताच शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. त्याचबरोबर अनेक भागातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा प्रचारही आजच्या दिवशी थांबविण्यात आला. सोशल मीडियावरुन अजितदादांना श्रध्दांजली वाहत अनेकांनी स्टेट्सला फोटो ठेवले होते.
परखड मत मांडणारा नेता हरपला
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आकस्मिक अपघाती निधन हे सर्वांना धक्का देणारे असे आहे. राजकारणात स्वतःचे परखड मत मांडणारे, बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणत परिणामांची तमा न बाळगता स्पष्टपणे निर्णय घेणारे नेते होते. इचलकरंजीच्या कृष्णा योजना बळकटीकरणातील ८ किलोमीटरचे काम पूर्णतः शासन खर्चातून करून देण्यात अजितदादांचे मोलाचे सहकार्य लाभले. पवार आणि आवाडे घराण्याचे कौटुंबिक नाते त्यांनी जपले होते. त्यांनी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला राजकारण विरहित मदत करण्याची भूमिका जोपासली होती, अशी भावना माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केली.
दादांच्या जाण्याने अपरिमित हानी
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे तमाम महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि स्पष्टवक्तेपणा असणारे नेते होते. आमदार म्हणून काम करताना मला त्यांचे मोठे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रश्नांची त्यांना जाण होती. त्यांच्या आकस्मिक जाण्याने राज्याची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्याकडे एखादे काम घेऊन गेलो आणि रिकाम्या हाती परतलो असे कधीच घडले नाही. इचलकरंजीचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मोलाचे सहकार्य दिले. सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ व त्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता आज आपल्यातून हरपला आहे.
– राहुल आवाडे, आमदार, इचलकरंजी विधानसभा