अकोल्यात 26 लाख 57 हजार ज्येष्ठांना 'अमृत' लाभ'; अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे सादर (सौजन्य - नवराष्ट्र टीम)
अकोला : महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य परिवहन (एस.टी.) महामंडळाच्या माध्यमातून अमृत मोफत प्रवास योजना 75 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अकोला विभागात (अकोला, बुलढाणा व वाशिम) जून व जुलै महिन्यांमध्ये २६ लाख ५७ हजार ८१८ ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, त्याच्या प्रतिपूर्तीसाठी १९ कोटी ६ लाख ५९ हजार रुपये अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
ज्येष्ठांसाठीच्या ‘अमृत मोफत प्रवास’ योजनेमुळे एस. टी. महामंडळाची प्रवासी वाहतूक बस पूर्ण क्षमतेने भरली जात असून, शासनाकडून मिळणाऱ्या परताव्यामुळे एस. टी. महामंडळाचे उत्पन्न देखील दिवसेंदिवस वाढत आहे. यातून महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्साह देखील वृद्धिंगत होत असून, एस.टी. प्रवाशांना अधिकाधिक उत्तम सेवा देण्यासाठी त्यांनाही मानसिक बळ मिळत आहे. यातून एक सकारात्मक उर्जा निर्माण होऊन महामंडळ आणि प्रवासी यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळत आहे.
एस.टी. महामंडळाच्या नवनवीन योजनांमुळे राज्य परिवहन महामंडळाला जणू नवसंजीवनीच मिळाली आहे. या योजनांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे महामंडळाच्या तिजोरीत भरमसाठ वाढ होताना दिसून येत आहे. एसटी महामंडळाने ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत मोफत प्रवास ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते.
गत २ महिन्यात अकोला विभागात या योजनेअंतर्गत २६ लाख ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला आहे. ६५ ते ७५ वर्षे वयाच्या नागरिकांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली जात आहे, तर ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी महामंडळाच्या एसी बसेससह सर्व बसेसमध्ये प्रवास मोफत ठेवण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी योजनेअंतर्गत प्रवासात करताना आपल्यासोबत आता एनएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. हे कार्ड आपल्या जवळच्या आगारातच बनवून मिळते. त्यामुळे हे कार्ड काढून महामंडळाचे सहकार्य करावे. याशिवाय महिला, विद्यार्थी व इतर घटकांसाठी देखील विविध योजना राबविल्या जातात.






