
अकोला मनपा निवडणूकीसाठी ६२८ मतदान केंद्रे निश्चित (Photo Credit- X)
निवडणुकीचे महत्त्वाचे टप्पे
महापालिका निवडणूकीसाठी १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. महापालिकेच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणपणे चार जागा असतील.
काही महानगरपालिकांच्या काही प्रभागांत ३ अथवा ५ जागा असतील. स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे संस्थांच्या नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे परंतु विविध राजकीय पक्षांची मागणी लक्षात घेऊन मनपा निवडणुकीत पारंपरिक पद्धतीनेच नामनिर्देशनपत्रे ऑफलाइन दाखल करता येतील.
जातवैधता पडताळणीसाठी ६ महिन्यांची मुदत
राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. जात प्रमाणपत्र असेल, परंतु जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्यास जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा तसा अर्ज केला असल्याचा अन्य कोणताही पुरावा देणे आवश्यक राहील. सहा महिन्यांच्या कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यात येईल, असे हमीपत्र देखील संबंधित उमेदवारांना द्यावे लागेल. या विहित मुदतीत म्हणजे निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवाराची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल.
मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या
मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या २७डिसेंबरला प्रसिद्ध केल्या जातील. मतदार याद्यांतील संभाव्य दुबार मतदारांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सर्व संबंधित महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त त्यांच्या स्तरावर कारवाई करीत आहेत.