
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक १८ मधील गौतम भगवान गरड (वय ६२) हे सकाळी साडेआठच्या सुमारास शहा बाबू हायस्कूल येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी निघाले होते. मतदान केंद्राच्या जवळ पोहोचले असता, त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले. उपस्थित नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Municipal Elections 2026: राजकीय क्षेत्रातील ‘या’ दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा PHOTO
गौतम गरड हे पानपट्टीचा छोटासा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत होते. त्यांच्या पश्चात पत्नी अनुसया गरड आणि एक दिव्यांग मुलगा कुणाल आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या अचानक जाण्याने गरड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. “लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हायला गेले आणि प्राण गमावले,” अशी भावना व्यक्त करत नातेवाईकांनी कुटुंबाला शासकीय मदत देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, अकोला महानगरपालिकेसाठी मतदानाचा वेग काहीसा संथ पाहायला मिळत आहे. दुपारी १ वाजेपर्यंत शहरात सरासरी १७.२५ टक्के मतदान झाले आहे. प्रशासनाने सर्व केंद्रांवर पिण्याचे पाणी, शेड, व्हीलचेअर आणि ज्येष्ठांसाठी स्वतंत्र रांगांची सोय केली आहे. प्रत्येक प्रभागात महिलांसाठी विशेष ‘सखी/गुलाबी’ मतदान केंद्रेही उभारण्यात आली आहेत.