HSRP नसलेल्या तब्बल 721 वाहनांवर RTO ची धडक कारवाई; 500 ते 1000 रुपये दंड
अकोला : वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड अथवा बनावटगिरी करून होणारे गुन्हे रोखण्यासह रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची सहज ओळख पटावी, यासाठी शासनाने सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविणे अनिवार्य केले आहे. मात्र, अद्यापही काही वाहनधारकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
मागील दोन महिन्यांत एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या ७२१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ७६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकडे सुरुवातीला वाहनधारकांचा कल कमी होता. मात्र, आता त्यात हळूहळू वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ९१ हजार वाहनधारकांनी आपल्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविली असून, त्याचे प्रमाण ५०.५३ टक्के आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांनाही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात २०१९ पूर्वीची एक लाख ५९ हजार ३१४ वाहने आहेत. मात्र, एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी येणारा खर्च पाहता अनेक वाहनधारकांकडून अद्यापही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
लवकरात लवकर नंबर प्लेट लावावा
वाहनधारकांना अन्य प्रशासकीय अडचणींचाही सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वाहनधारकांनी आपल्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, अशा सूचना अकोला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वेळोवेळी करण्यात आल्या आहेत.
HSRP नोंदणीची संख्या 91 हजारांवर
सुरुवातीला जिल्ह्यात एचएसआरपीसाठी नोंदणी करणाऱ्या वाहनधारकांची संख्या ८ ते १० हजारांच्या आसपास होती. आता ही संख्या ९१ हजारांवर पोहोचली आहे. एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे अनिवार्य असल्याचे वाहनधारकांच्या लक्षात येत असल्याने नोंदणीच्या प्रमाणातही हळूहळू वाढ होत आहे.
जिल्ह्यात एचएसआरपीसाठी 21 केंद्र
जिल्ह्यात एचएसआरपी नंबरप्लेटसाठी २१ केंद्र नियुक्त असून त्यामध्ये एचएसआरपी फिटमेंट सेंटर कौलखेड, तुकाराम कॉम्प्लेक्स, संत तुकाराम हॉस्पिटल, दामले चौक, गोयनका मोटरबाईक्स, एचएसआरपी फिटमेंट सेंटर बाळापूर, प्रशांत मोटर्स तेल्हारा, शेतकरी मोटर्स अकोट, पुजा मोटार बाइक्स पातूर, सर्वज्ञ ऑटोमोबाईल्स बार्शीटाकळी, एफटीए एचएसआरपी फिटमेंट सेंटर मूर्तिजापूर आदीचा समावेश आहे. वाहनधारकांनी या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
सुज्ञ नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे महत्त्व लक्षात घेऊन राज्यशासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे. तरी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांना ही नंबरप्लेट बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा.
– रवींद्र भुयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी






