
Akola News : पाणीटंचाईमुळे बांधकाम व्यवसाय ठप्प; कामगारांच्या रोजगारावरही कुऱ्हाड
बांधकामांवरील स्थगितीमुळे अकोला शहर आणि परिसरात रोजंदारीवर काम करणाऱ्या शेकडो मजुरांचा रोजगार अचानक बंद झाला आहे. हाताला काम नसल्याने आणि दैनंदिन खर्च भागविण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने परजिल्ह्यांतून तसेच ग्रामीण भागातून आलेल्या अनेक कामगारांनी आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे स्थलांतर वाढले आहे. बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्याचा फटका केवळ सिमेंट आणि विटांच्या व्यावसायिकांनाच नव्हे, तर टाइल्स, हार्डवेअर, प्लंबिंग साहित्य, रंग आणि सळई विक्रेत्यांनाही बसला आहे.
टाईल्सची विक्री आणि मागणी मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. व्यापाऱ्यांच्या गोदामांमध्ये माल पडून असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल प्रभावित झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नव्याने सुरू होणारी तसेच ७० टक्क्यांपेक्षा कमी पूर्ण झालेली बांधकामे तातडीने थांबविण्यात आली आहेत. त्यामुळे नवीन बांधकामांची कामे सुरू करणेही शक्य होत नाही. अंतिम टप्यात असलेली काही बांधकामे सुरू असली, तरी मजुरांच्या कमतरतेमुळे त्यांच्या कामाचा वेग मंदावला आहे.
उद्योजक आणि व्यापाऱ्यांची वाढली चिंता
बांधकामांवरील अचानक आलेल्या स्थगितीमुळे विकासक, कंत्राटदार आणि लहान-मोठे व्यापारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बँकांचे हप्ते, दुकानांचे भाडे आणि कर्मचाऱ्यांचे वेतन कसे भागवायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असले, तरी बांधकाम बंदीमुळे निर्माण झालेल्या रोजगाराच्या समस्येवर शासनाने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी बांधकाम व्यावसायिक आणि पूरक व्यवसायांतील व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.
मजुरांचे स्थलांतर वाढले
अकोल्यातील बांधकाम व्यवसायात मध्य प्रदेशातून आलेल्या मजुरांची संख्या मोठी आहे. विशेषतः बैतूल जिल्ह्यातील अनेक मजूर येथे काम करतात. बांधकामे बंद झाल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. नियमित काम आणि उत्पन्न बंद झाल्यामुळे अनेक मजुरांना आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता सतावत आहे.