पोपटखेड पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना... (File Photo)
अकोला : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोट तालुक्यातील पोपटखेड प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रकल्पाचे दार क्रमांक १ आणि ४ प्रत्येकी २ सेंटीमीटरने उघडण्यात आले. या दोन्ही दरवाजांतून एकूण ९५.४२ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
सातपुडा पर्वतरांगांमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर तसेच रविवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. परिणामी, पोपटखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली. धरणातील जलपातळी वाढत असल्याने जलसंपदा विभागाने परिस्थितीचा आढावा घेत सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा भाग म्हणून दोन दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला. धरण प्रशासनाच्या माहितीनुसार, सध्या नदीपात्रात ९५.४२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पाणलोट क्षेत्रातून होणाऱ्या आवकेनुसार विसर्गाच्या प्रमाणात आवश्यकतेनुसार वाढ किंवा घट केली जाऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसंपदा विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सातपुडा परिसरात दमदार पाऊस
सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे अकोट तालुक्यातील नद्या, नाले आणि ओड्यांच्या पाणीपातळीतही वाढ होत आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिक तसेच नदीपात्रालगत राहणाऱ्या ग्रामस्थांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राज्यात सरासरीपेक्षा 16.5 टक्के कमी पाऊस
महाराष्ट्रात १ जून ते ६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सरासरीच्या तुलनेत केवळ ८३.५ टक्के पाऊस झाला, म्हणजेच सरासरीपेक्षा १६.५ टक्के कमी पाऊस झाला. दीर्घकाळच्या दुष्काळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील खरीप पिकांना धोका निर्माण झाला आहे. बीडमध्ये सरासरीच्या तुलनेत ६८.५ टक्के पाऊस झाला.
गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; देसाईगंजमध्ये सर्वाधिक 145 मिमी पाऊस






