गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; देसाईगंजमध्ये सर्वाधिक 145 मिमी पाऊस (File Photo)
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात सरासरी ४७.३ मिमी पावसाची नोंद झाली. देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक १४२ मिमी, तर देसाईगंज पर्जन्यमापक मंडळात तब्बल १४५ मिमी पाऊस झाला. शंकरपूर येथेही १३९ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे दोन ठिकाणी अतिवृष्टी, तर पाच पर्जन्यमापक मंडळांत जोरदार पाऊस झाला.
जिल्ह्यातील ४५ पैकी ४५ पर्जन्यमापक मंडळांमध्ये पावसाची नोंद झाली. देसाईगंज तालुक्यापाठोपाठ कुरखेडा येथे ६४.९, गडचिरोली ५६.९, आरमोरी ५१.५, कोरची ४७, सिरोंचा ४५.२, धानोरा ४०.६, भामरागड ३५.७, अहेरी ३०.२, एटापल्ली २४.८, चामोर्शी १८.८ आणि मुलचेरा येथे १०.६ मिमी पाऊस झाला. दरम्यान, १ जूनपासून १३ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत अद्याप तूट कायम आहे.
उपलब्ध पर्जन्यमान अहवालानुसार, या कालावधीत जिल्ह्यात सुमारे ९०६.२ मिमी पाऊस झाला असून, पर्जन्यमानाची टक्केवारी ७९ टक्के आहे. त्यामुळे एका दिवसाच्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी हंगामातील पावसाची तूट अद्याप भरून निघालेली नाही.
दरम्यान, सप्टेंबरच्या सुरुवातीपासून पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांत खरीप पिके पाण्याच्या प्रतीक्षेत होती. रविवारी झालेल्या पावसामुळे विशेषतः धान, सोयाबीन, कापूस आणि तूर उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. ऑगस्टनंतर पावसाने उघडीप घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी उन्हाचा कडाका देखील अनुभवत आहे. असे असताना आता विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित भागांत हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
नागपूर शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस; सुरुवातीच्या काही तासांतच…






