
काटेपूर्णा अजूनही तहानलेले; साठा २२.६४ टक्के, जलसाठ्यात वाढीची प्रतीक्षाच
अकोला : जिल्हा तसेच अकोला शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या महान येथील काटेपूर्णा धरणाचा जलसाठा पावसाळा संपत आला तरी २२.६४ टक्क्यांवरच स्थिर आहे. त्यामुळे अकोलेकरांच्या चिंतेत भर पडली असून, त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावर होत आहे. त्या तुलनेत जिल्ह्यातील दुसरे मोठे धरण असलेल्या वान धरणाचा जलसाठा ९०.५४ टक्क्यांवर पोहोचल्याने ही बाब समाधानकारक आहे.
अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत काही ठिकाणी संततधार तर काही भागांत जोरदार पाऊस झाला. मात्र, काटेपूर्णा धरण परिसर आणि पाणलोट क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणातील जलसाठा वाढण्याची अपेक्षा पूर्ण झालेली नाही. धरणांमध्ये पाण्याची आवक वाढण्यासाठी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होणे आवश्यक असते. जिल्ह्याच्या काही भागात पाऊस होत असला तरी धरण परिसरात अपेक्षित पर्जन्यमान नसल्याने जलसाठा वाढीचा वेग मंदावला आहे. परिणामी, आगामी काळातील पाणी उपलब्धतेबाबत चिंता कायम असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात दोन मोठे, चार मध्यम आणि २४ लघु जलप्रकल्प आहेत. सिंचनाच्या पाण्याची गरज भागविली जाते. यंदा मात्र पावसाळा अपेक्षेप्रमाणे झालेला नसल्याने वान आणि पोपटखेड धरण वगळता अन्य जलप्रकल्पांची स्थिती चिंताजनक आहे. आगामी काळात अशीच परिस्थिती कायम राहिल्यास जिल्ह्यात पाणीटंचाईची शक्यता अधिक तीव्र होऊ शकते. त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची आवश्यकता आहे.
शहरात महिन्यातून दोनदा पाणीपुरवठ्याची शक्यता
अकोला शहरावर भीषण पाणीटंचाईचे मोठे सावट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे धरणातील जलसाठा वेगाने खालावला आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास अकोला शहराला आगामी काळात महिन्यातून केवळ दोनदाच पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासन आतापासूनच सतर्क झाले असून पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जात आहे.
जलप्रकल्पातील साठा
पोपटखेड धरण वगळता अन्य जलप्रकल्पांची स्थिती चिंताजनक आहे. आगामी काळात अशीच परिस्थिती कायम राहिल्यास जिल्ह्यात पाणीटंचाईची शक्यता अधिक तीव्र होऊ शकते. त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची आवश्यकता आहे.