अकोल्यात विनानंबर टँकरचा अक्षरश: सुळसुळाट; महानगरपालिका प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
शहरातील अनेक भागात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे पाण्याच्या टँकरची मागणी वाढली आहे. नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने शहरात पाणीपुरवठ्यासाठी १० टँकर उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, अकोला महानगरपालिकेचे स्टिकर लावलेले काही टँकर तसेच खाजगी टँकर विनानंबर प्लेट फिरत असल्याचे दिसून येत आहे.
वाहनांवर नोंदणी क्रमांक नसल्याने त्यांची मालकी आणि ओळख पटविणे कठीण होते. वाहतूक नियमांनुसार प्रत्येक वाहनाच्या पुढील आणि मागील बाजूस स्पष्ट नोंदणी क्रमांक असणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांचे उल्लंघन करून टैंकर शहरात धावत आहेत. अशा वाहनांमुळे अपघात घडल्यास संबंधित वाहनाचा शोध घेणेही पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरू शकते. सामान्य नागरिकांच्या वाहनांवर नंबर प्लेट नसल्यास वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जाते.
मग महानगरपालिकेचे टँकर विनानंबर प्लेट फिरत असतानाही संबंधित विभाग कारवाई का करीत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरातील अशा सर्व टँकरची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
टँकरवरही संबंधित विभागाने कारवाई करावी
सामान्य नागरिकांच्या वाहनाला नंबर प्लेट नसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मग पाणीपुरवठा करणाऱ्या महानगरपालिकेच्या विनानंबर प्लेट टँकरवरही संबंधित विभागाने कारवाई करायला हवी.
प्रश्न १ : अकोल्यात कोणता प्रकार समोर आला आहे?
उत्तर : महानगरपालिकेचे तसेच काही खासगी पाण्याचे टँकर विनानंबर प्लेट रस्त्यांवर धावत असल्याचे समोर आले आहे.
प्रश्न २ : विनानंबर टँकर कुठे फिरत आहेत?
उत्तर : हे टँकर शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळांतूनही बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत.
प्रश्न ३ : अकोला महापालिकेने किती टँकर उपलब्ध करून दिले आहेत?
उत्तर : नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी महानगरपालिकेने शहरात १० पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले आहेत.






