
माजी शिक्षणाधिकाऱ्यास बेड्या; बनावट शालार्थ आयडीप्रकरणी एसआयटीकडून कारवाई
अकोला : बनावट शालार्थ आयडीप्रकरणी शासनाची १६० कोटींची आर्थिक फसवणूक केल्याने जळगाव येथे कार्यरत तत्कालीन माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगाणेकर यांना नाशिकच्या एसआयटी पथकाने त्यांना धुळे येथून अटक केली आहे.
नाशिक उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार यषथील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वैयक्तिक मान्यता व शालेय प्रस्ताव नसताना मागील तारखेच्या नियुक्त्या दाखविण्यात आल्या होत्या. बनावट शालार्थ आदेशाच्या आधारे शालार्थ प्रणालीत शालार्थ ड्राफ्ट भरून घेऊन वेतन व थकबाकी रक्कम प्राप्त करून घेऊन शासनाची १६० कोटींची फसवणूक केली.
याप्रकरणी संबंधित मुख्याध्यापक, तत्कालीन शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी, वेतन अधिक्षक व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यात माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर जळगाव जिल्हा परिषदेत सन २०११ ते २०१५ या कालावधीत माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक असताना जळगाव जिल्ह्यातील २५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यतेचे कोणतेही प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यलायात प्राप्त नसताना बनावट वैयक्तिक मान्यता दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
त्या अनुषंगाने माजी शिक्षणाधिकारी हिंगोणेकर धुळे येथे असल्याची माहिंती मिळाली होती. गुन्हे शाखेचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार नांदुळीकर, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन नाशिक रोडव पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
शिक्षण मंडळ आयडीचा विषय विधानसभेतही
नाशिक जिल्ह्यातील बोगस शालार्थ चांगलाच गाजला होता. त्यानंतर एसआयटीने आजी-माजी माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना चौकशीसाठी नाशिकला चार ते पाच वेळा बोलावले होते. त्यानंतर या प्रकरणातील चौकशीत तथ्य आढळल्यानंतर एसआयटीने फास आवळला आहे.