फोटो सौजन्य- सोशल मीडिया
IIT Madras AI Startup Program: जर तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा असेल, तर आयआयटी मद्रास तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आले आहे. संस्थेच्या वाधवानी स्कूल ऑफ डेटा सायन्स अँड एआयने ‘एक यशस्वी AI स्टार्टअप’ या नावाचा एक विशेष ऑफलाइन कार्यक्रम सुरू केला आहे. हा पाच दिवसांचा कार्यक्रम १० ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान आयआयटी मद्रास कॅम्पसमध्ये आयोजित केला जाईल. यामध्ये विद्यार्थी, संशोधक आणि नवउद्योजकांना AI आधारित स्टार्टअप तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया शिकवली जाईल.
हा कोर्स फक्त क्लासरूमपुरता मर्यादित राहणार नाही, तर यामध्ये व्यावहारिक प्रशिक्षणावरही विशेष भर दिला जाईल. सहभागींना एखादी AI आयडिया बाजारपेठेच्या गरजेनुसार कशी विकसित करावी, मिनिमम व्हायबल प्रोडक्ट कसे तयार करावे, बिझनेस मॉडेल कसे बनवावे आणि गुंतवणूकदारांसमोर आपला स्टार्टअप प्रभावीपणे कसा सादर करावा, हे शिकवले जाईल. याशिवाय ग्राहक शोध, मार्केट व्हॅलिडेशन, प्रोडक्ट-मार्केट फिट, युजर ॲक्विझेशन, महसूल धोरण, फंड उभारणी आणि AI स्टार्टअप पुढे नेण्याच्या धोरणांवरही सविस्तर प्रशिक्षण दिले जाईल.
या कार्यक्रमाचे नेतृत्व लक्ष्मी शंकर करणार आहेत, जे ‘टुगेदर फंड’चे जनरल पार्टनर आणि गुगल सर्चचे माजी व्हाईस प्रेसिडेंट होते. त्यांनी ट्विटर, आयबीएम आणि ईवाय सारख्या जागतिक कंपन्यांमध्येही वरिष्ठ नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. तसेच ते स्टॅनफोर्ड ग्रॅजुएट स्कूल ऑफ बिजनेसचे स्लोआन फेलो देखील आहेत. त्यांच्या अनुभवामुळे सहभागींना उद्योग आणि स्टार्टअप जगताची वास्तविक आव्हाने समजून घेण्याची संधी मिळेल.
कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी ‘पिट्च डे’ आयोजित केला जाईल. यामध्ये सर्व सहभागी गुंतवणूकदारांच्या एका पॅनेल्समोर आपल्या AI स्टार्टअपच्या कल्पना सादर करतील. सर्वोत्तम सादरीकरण करणाऱ्या टीमला त्यांचा AI स्टार्टअप पुढे नेण्यासाठी ४ लाख रुपयांची रोख पुरस्कार दिला जाईल. ही रक्कम सुरुवातीच्या टप्प्यात स्टार्टअप विकसित करण्यास मदत करेल आणि सहभागींना थेट गुंतवणूकदारांशी जोडण्याची संधी देखील मिळवून देईल.
NTA Structure Reforms: पेपर लीकच्या विळख्यात अडकलेली एनटीए कशी काम करते? वाचा एका क्लिकवर..
देशात AI तंत्रज्ञान वेगाने रोजगार आणि उद्योजकतेच्या नवीन संधी निर्माण करत आहे. अशा वेळी आयआयटी मद्रासचा हा कार्यक्रम विद्यार्थी आणि संशोधकांना केवळ तांत्रिक ज्ञानच देणार नाही, तर त्यांना स्वतःच्या कल्पनेला एका यशस्वी व्यवसायात बदलण्याचा व्यावहारिक अनुभवही प्रदान करेल. जे तरुण AI क्षेत्रात आपला स्टार्टअप सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा कार्यक्रम शिकण्यासाठी, नेटवर्किंग करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचण्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकतो.






