
alliance between BJP and Shiv Sena Shinde group broken in Parbhani Maharashtra Local Body Elections
Maharashtra Local Body Elections : परभणी : महानगर पालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याच्या पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये मागील चार पाच दिवसांपासून भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत बैठका झाल्या. मात्र स्थानिक भाजप नेत्यांनी आपल्या स्वार्थांसाठी युती तोडल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी मंगळवारी (दि. ३०) पत्रकार परिषदेत केला. यावेळी शिवसेना महानगराध्यक्ष माणिक पौंढे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता सूर्यवंशी, सखुबाई लटपटे, प्रवीण देशमुख, डॉ. धर्मराज चव्हाण आदींची उपस्थिती होती.
परभणीत महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणूकीत हिंदुत्ववादी मतांमध्ये विभाजन होऊ नये, दोन्ही पक्षाच्या युतीच्या माध्यमातून महापालिकेवर निर्विवाद बहुमत मिळवावे व परभणी महानगराच्या विकासाचा मार्ग खुला व्हावा या उदात्त हेतूने आपण भाजपबरोबर युतीचा निर्णय घेतला.
हे देखील वाचा : ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये राज ठाकरेंवर अन्याय? आरोप होताच संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
अचानक अधिक जागांची भाजपाने केली मागणी
त्या संदर्भात गेल्या आठ दिवसात चार-सहा बैठकांमधून चर्चा केली. भारतीय जनता पक्षासोबत झालेल्या बैठकीत १३:२० असा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता. सर्व बोलणी झाली असताना अचानक काही अधिकच्या जागांची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. शिवसेना नेते उदय सामंत आणि भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संमतीने युती झाली असताना भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी ठरलेल्या जागावाटप सूत्रापेक्षा ऐनवेळी अधिकच्या जागांची मागणी केल्याने तसेच भाजपचे नेते बावनकुळे यांचा अंतिम शब्द असतानाही अधिकच्या जागेची मागणी केल्याने युती फिस्कटल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांन केला.
हे देखील वाचा : आता गुन्हा केल्यावर शिक्षा नाही? दिल्ली सरकारने केले ‘हे’ विधेयक मंजूर; नेमका प्रकार काय?
स्थानिक भाजप नेत्यांना आपल्या घरच्या व जवळच्या लोकांना उमेदवारी देण्यासाठी ही भाजप सेना युती तोडल्याचा दावाही त्यांनी केला. एवढेच नाही तर भाज महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्या बाळासाहेब ठाकरे पक्ष, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांची आघाडी आणि काँग्रेस पक्षाशी देखील संपर्क साधून असल्याचा गंभीर आरोप यावेळी भरोसे यांनी केला. असे असले तरी शिवसेना होऊ घातलेल्या परभणी महापालिका निवडणुकीत आपले सर्व उमेदवारा विजयी करेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस व वंचितची आघाडी
नांदेड महापालिकेसाठी काँग्रेस व वंचित आघाडीमध्ये आघाडी झाली असून काँग्रेस पक्षाला ६१, वचित आघाडीला २० जागा देण्याचे ठरले असल्याची माहिती काँग्रेसचे मनपा निवडणूक प्रभारी माणिकराव ठाकरे, खा. रवींद्र चव्हाण, वंचित आघाडीचे अविनाश भोसीकर, माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी संयुक्तरीत्या एका पत्रकार परिषदेत दिली.
ही युती वरिष्ठ पातळीवर झाली असून वंचित आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या युतीवर शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले. नांदेड महापालिकेसाठी वरिष्ठ स्तरावर बोलणी यशस्वी झाली असून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते व नेते एकजुटीने महापालिकेची निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेस पक्षाचे अनेक माजी नगरसेवक एमआयएम व भाजपात गेले आहेत यावर बोलताना ते म्हणाले, नांदेड महापालिकेमध्ये जनतेने या सर्व नगरसेवकांना निवडून दिले होते त्यांनी दुसऱ्या पक्षात जाताना जनतेला विचारून जायला हवे होते.
एमआयएम मध्ये गेलेल्या नगरसेवकांनी जनतेला विचारात घेतले आहे का? हे सर्व नगरसेवक स्वतःच्या फायद्यासाठी एमआयएम मध्ये गेले आहेत बीजेपीच्या सांगण्यावरून व बहुजनांची मते फोडण्यासाठी हे कारस्थान करण्यात आले आहे. हे नगरसेवक जरी भाजपात, एमआयएम मध्ये गेले असले तरी, जनता ही काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे आहे. बीजेपीच्या नेत्यांनीच या माजी नगरसेवकांना एमआयएम मध्ये पाठवले असून यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले आहेत. काँग्रेसपासून जनता अजूनही दूर गेलेली नाही. अजूनही सामान्य जनता विचारांनी काँग्रेसच्याच जवळ आहे.