
मेळघाटात पक्ष्यांच्या १८ प्रजातींची नोंद! तारूबांदा परिसरात वनविभागाची मोहीम; जैवविविधतेची समृद्धी
Amravati News: मेळघाटच्या घनदाट जंगलात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या वैविध्यपूर्ण प्रजाती आणि समृद्ध जैवविविधतेचा खजिना पुन्हा एकदा समोर आला आहे. गुगामल वन्यजीव विभागाच्यावतीने धारणी तालुक्यातील तारूबांदा येथील कुंड परिसरात राबविण्यात आलेल्या पक्षी निरीक्षण मोहिमेत तब्बल १८ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. जंगल आणि तलाव परिसरात मुक्तपणे विहार करणाऱ्या रंगीबेरंगी पक्ष्यांचे आवाज, हालचाली आणि नैसर्गिक अधिवासाचा अभ्यास करत वनाधिकारी, कर्मचारी आणि निसर्गप्रेमींनी मेळघाटच्या जैवविविधतेचा अनोखा अनुभव घेतला.(फोटो सौजन्य – AI)
अतुल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप भरत, वनपरिक्षेत्र अधिकारी जितेंद्र फते, सलामे, शेंडे, दारुसबे, धांडे, मावस्कर,मोरे, राणा यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वनरक्षक वैष्णवी धांडे, निशा मावस्कर, भिलावेकर, जामुनकर, लक्ष्मी धांडे, रोहिणी धांडे आणि मनीषा भुसुम यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला. मोहिमेदरम्यान पथकाने जंगल आणि तलाव परिसरात फिरून पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण केले. पक्ष्यांचे थवे, त्यांची ये-जा, किलबिलाट, हालचाली, अधिवास आणि वर्तन यांची नोंद घेण्यात आली.
यात रुद्र शेपटीचा खंडघा, सामान्य खंड्या, लाल पंखांचा बाज, भारतीय पाणकावळा, तुरा असलेला टिटवी, पौर्वात्य मधमाशी खाऊ, पांढरी धोबी, लहान पायांचा सर्पगरुड, पश्चिमी पिवळी धोबी, लहान गरुड, मोठा पाणकावळा, आशियाई हिरवा मधमाशी खाऊ, जांभळ्या डोक्याचा पोपट, अलेक्झांड्रिन पोपट, गुलाबी कंठाचा पोपट, पांढऱ्या गळ्याचा खंड्या, मोठा कोयल आणि भारतीय तलाव बगळा अशा १८ प्रजातींची नोंद झाली.
मेळघाटचे जंगल हे विविध पक्षी आणि वन्यजीवांचे नैसर्गिक आश्रयस्थान आहे. मात्र, जैवविविधतेचे जतन करण्यासाठी पक्ष्यांच्या प्रजाती, त्यांच्या सवयी आणि अधिवासाची माहिती असणे आवश्यक आहे. अशा निरीक्षण मोहिमांमुळे पक्ष्यांची ओळख पटण्यासोबतच त्यांच्या संवर्धनाचे महत्त्वही अधोरेखित होते. वनकर्मचारी आणि निसर्गप्रेमींना प्रत्यक्ष जंगलात पक्ष्यांचा अभ्यास करण्याची संधी मिळत असून, भविष्यात त्यांच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांची निश्चितच मदत होणार आहे.