'धापेवाडा'तून २७०० क्युमेक्स विसर्ग! पुजारीटोला धरणाचे ८ दरवाजे उघडले; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
Amravati News: गोंदिया जिल्ह्यात एक दिवसापूर्वी झालेल्या संततधार पावसासह ऊर्ध्व भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाल्याने जलाशयांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गोंदिया जिल्हा प्रशासन आणि संबंधित सिंचन विभागाने धापेवाडा बॅराज, संजय सरोवर आणि पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. धापेवाडा बॅराजमधून आगामी काही तासांत नदीच्या नैसर्गिक प्रवाहात २७०० क्युमेक्स पाणी सोडण्याची तयारी करण्यात आली आहे.(फोटो सौजन्य – istock)
Amravati News: कुपोषणाचे आकडे घटले; आव्हान कायम! २२९ अंगणवाड्यांमधून १४ हजार ६०७ बालकांना पोषण आहार
धापेवाडा बॅराजच्या जलस्तरात सातत्याने वाढ होत असल्याने नदीच्या नैसर्गिक प्रवाहात २७०० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. बॅराजमध्ये होणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार विसर्गाचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते. त्याबाबतची माहिती प्रशासनाकडून वेळोवेळी जाहीर करण्यात येणार आहे.
जलाशयांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी नाल्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी सध्या नदीपात्र, नाले आणि जलाशयांच्या परिसरात जाणे टाळावे. संबंधित विभागांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, सखल भागातील नागरिकांना परिस्थितीची माहिती वेळेत देण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत.
Amravati News: एचएसआरपी नसलेल्या ९१९ वाहनांवर कारवाई! पहिल्यांदा पकडल्यास ५०० ते १००० रुपयांचा दंड
संजय सरोवर धरणातील उपयुक्त जलसाठा १०० टक्के म्हणजे ४१०.६१० दलघमी झाला आहे. धरणाची सध्याची जलपातळी ५१९.३८० मीटर नोंदविण्यात आली आहे. जलपातळी नियंत्रित करण्यासाठी २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता धरणाचे दोन रेडियल गेट ०.३० मीटरपर्यंत उघडण्यात आले. त्यातून सध्या ९६ क्युमेक्स म्हणजे ३,३८२ क्युसेक पाण्याचा नदीत विसर्ग सुरू आहे. पुजारीटोला धरणाची जलपातळी ३१९.०९ मीटर, तर उपयुक्त जलसाठा ८७.७८ टक्के नोंदविण्यात आला आहे. जलपातळीत झालेल्या चढ-उतारानंतर शुक्रवारी दुपारी ३ वाजता विसर्गात बदल करण्यात आला. धरणाचे सर्व आठ गेट ०.३० मीटरपर्यंत उघडण्यात आले असून, त्यातून सध्या १८० क्युमेक्स म्हणजे ६,३५६.७० क्युसेक पाण्याचा नदीत विसर्ग सुरू आहे.






