
Amravati News: एचएसआरपी नसलेल्या ९१९ वाहनांवर कारवाई! पहिल्यांदा पकडल्यास ५०० ते १००० रुपयांचा दंड
Amravati News: अमरावती हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) लावणे अनिवार्य असतानाही नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाईचा बडगा उगारला आहे. राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत २६९० वाहनांची तपासणी केली असून, जिल्हाभरातील एचएसआरपी नसलेल्या आतापर्यंत ९१९ वाहनचालकांवर कारवाई करून ८७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.(फोटो सौजन्य – AI)
जुन्या वाहनांवर एचएसआरपी बसविण्यासाठी शासनाने सुमारे पाच वेळा मुदत वाढ दिली होती. मात्र, मुदत संपूनही अनेक वाहनचालकांनी नवीन क्रमांक प्लेट बसविलेली नसल्याचे तपासणीत आढळून आले. त्यामुळे आरटीओने नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम अधिक तीव्र केली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी सांगितले की, शहर व जिल्ह्यात सहा भरारी पथके सातत्याने तपासणी करीत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ ई-चलानद्वारे कारवाई केली जात आहे. आतापर्यंत वाहनचालकांर कारवाई करून ८७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
आरटीओने वाहनधारकांना तातडीने एचएसआरपी बसवून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, ही विशेष तपासणी मोहीम आगामी काळातही अधिक कडकपणे सुरू राहणार असल्याचा इशाराही दिला आहे. जिल्ह्यातील कारवाईची सद्यस्थिती अमरावती जिल्ह्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) नसलेल्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाईची प्रक्रिया १ जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेली सुमारे ३ लाख ८४ हजार वाहने अशी आहेत, ज्यांनी अद्याप एचएसआरपी प्लेट लावलेली नाही. हे सर्व वाहनचालक आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या रडारवर आहेत.
जिल्ह्यात एकूण ७.५ लाख वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या वाहनांवर ही नंबर प्लेट आढळणार नाही, त्यांच्यावर १ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जात आहे. दंड भरण्याव्यतिरिक्त, जोपर्यंत वाहनाला एचएसआरपी प्लेट लावली जात नाही,तोपर्यंत आरटीओ कार्यालयातील महत्त्वाची कामे (जसे की पत्ता बदलणे, परवाना नूतनीकरण, वाहन हस्तांतरण) पूर्णपणे बंद (ब्लॉक) करण्यात आली आहेत.
यापूर्वी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून आली. अनेक वाहनधारकांनी ऑनलाइन नोंदणी केली; परंतु नंबर प्लेट अधिकृत केंद्रावर आल्यानंतरही त्या बसवून घेतल्या गेल्या नाहीत. परिणामी आजही अनेक वाहनांच्या एचएसआरपी प्लेट अधिकृत केंद्रांवर १५-१५ दिवसांपासून पडून असल्याची माहिती समोर आली आहे. वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन विभागाने एचएसआरपी बसविण्याची मुदत पाच वेळा वाढविली. अखेर मुदत संपल्यानंतर आता नियमाची सक्तीने अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, दंडात्मक कारवाईलाही वेग देण्यात आला.
एचएसआरपी नसलेल्या वाहनावर १,००० रु. ई-चलान.
शहर व जिल्ह्यात सहा भरारी पथकांद्वारे सातत्याने तपासणी.
कारवाई आणखी तीव्र होणार; तपासणी मोहीम सुरूच राहणार.
वाहनधारकांनी तातडीने एचएसआरपी बसवून दंड टाळण्याचे आवाहन.