
पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार
पुणे : भारतातील उपेक्षित व वंचित घटकांतील तसेच पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन आणि प्रवेश प्रक्रियेत मदत करणाऱ्या एकलव्य इंडिया फाऊंडेशनच्या दशकपूर्तीनिमित्त ‘एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स फेलिसिटेशन सेरेमनी’ पुण्यात उत्साहात पार पडला. परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. ९ सप्टेंबर रोजी एस. बी. रोड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व स्मारक येथील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला सुमारे २५ ग्लोबल स्कॉलर्स आणि त्यांचे पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी जॉन निकेल (हेड ऑफ पॉलिटिकल अँड बायलॅटरल अफेयर्स), ब्रिटिश डेप्युटी (हाय कमिशन, मुंबई) नितीन वाघमोडे (आयआरएस, आयुक्त, प्राप्तिकर-सवलती विभाग पुणे) आणि डॉ. हेमांगी कडलग (सहाय्यक प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर, सिम्बायोसिस इंटरनॅशनल, पुणे) हे मान्यवर उपस्थित होते.
एकलव्य इंडिया फाऊंडेशन गेल्या दशकभरापासून भारतातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित तसेच पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन, प्रवेश प्रक्रिया आणि शैक्षणिक सल्ला देत आहे. संस्थेच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळवून जागतिक विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गत शैक्षणिक वर्षात एकलव्य इंडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळवून विविध राज्यांतील सुमारे २५ विद्यार्थ्यांनी परदेशातील उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवला असून, त्यांना राज्य व केंद्र सरकार तसेच विविध आंतरराष्ट्रीय आणि सामाजिक संस्थांकडून मिळून १५ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या शिष्यवृत्ती प्राप्त झाल्या आहेत.
या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण आपल्या कुटुंबातून उच्च शिक्षणासाठी प्रथमच परदेशात जात असून, जगातील नामांकित विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याची त्यांची ही महत्त्वपूर्ण वाटचाल आहे. कार्यक्रमात पालकांनी आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल भावनिक अनुभवही व्यक्त केले. एकलव्य इंडिया फाऊंडेशनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजू केंद्रे म्हणाले की, गेल्या दशकभरात एकलव्यच्या मार्गदर्शनाखाली ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी भारतातील नामांकित शैक्षणिक संस्थांमधून उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच ११० हून अधिक विद्यार्थ्यांनी १२ देशांतील जागतिक विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतले असून, काही विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या संधी मिळू शकतात, हे या विद्यार्थ्यांच्या यशातून अधोरेखित होत आहे. कार्यक्रमादरम्यान एकलव्य इंडिया फाऊंडेशनच्या दशकभराच्या कार्याचा आढावा घेण्यात आला तसेच भविष्यातील शैक्षणिक उपक्रमांची दिशा मांडण्यात आली.