सिंचन प्रकल्पांच्या जलसाठ्यात २३ टक्क्यांची घट! जलाशयात ५८ टक्के तर उर्ध्व वर्धा प्रकल्पात ५७.३३ टक्के जलसाठा
Amravati News: अमरावती जिल्ह्यातील सिंचन विभागाने रविवारी जाहीर केलेल्या ताज्या अहवालानुसार, यंदा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये गतवर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत जलसाठ्यात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यातील सर्व ५६ सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या एकूण क्षमतेच्या ५८.३१ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच तारखेला हा साठा ८१.६७ टक्के होता. त्यामुळे यंदा गतवर्षाच्या तुलनेत तब्बल २३ टक्के कमी जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत उर्ध्व वर्धा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र, यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने प्रकल्पांमधील जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. जिल्ह्यातील ५६ प्रकल्पांची एकूण पाणीसाठवण क्षमता १,०४७.१४ दलघमी असून, सध्या त्यापैकी ६१०.५१ दलघमी म्हणजेच ५८.३१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच कालावधीत ८५५.१५ दलघमी म्हणजेच ८१.६७ टक्के पाणीसाठा होता.(फोटो सौजन्य – istock)
जिल्ह्यातील प्रमुख ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात सध्या ५७.३३ टक्के म्हणजेच ३२३.३९ दलघमी जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत या प्रकल्पात ९५ टक्के म्हणजेच ५३५.८५ दलघमी पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ५१.७८ टक्के म्हणजेच १३२.६८ दलघमी जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत या प्रकल्पांमध्ये ६३.९८ टक्के म्हणजेच १६३.९४ दलघमी पाणीसाठा होता. चंद्रभागा प्रकल्पात सर्वाधिक ८६.५१ टक्के, तर पूर्णा प्रकल्पात ८३.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. शाहनूरमध्ये ६१.८२ टक्के आणि सपनमध्ये ६४.२७टक्के जलसाठा आहे. दुसरीकडे, पांढरी प्रकल्पात केवळ २१.८३ टक्के आणि बोर्डी नाल्यात १६.५८ टक्के पाणी शिल्लक आहे. गडगा प्रकल्प पूर्णपणे कोरडा पडला असून, त्यात शून्य टक्के जलसाठा आहे.
जिल्ह्यातील ४८ लघु प्रकल्पांची स्थिती तुलनेने समाधानकारक आहे. या प्रकल्पांमध्ये एकूण क्षमतेच्या ६८.१२ टक्के म्हणजेच १५४.५२ दलघमी पाणीसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत हा साठा ६८.४९ टक्के म्हणजेच १५५.३६ दलघमी होता. त्यामुळे लघु प्रकल्पांमध्ये गतवर्षाच्या तुलनेत फारशी झालेली नाही. घट झालेली नाही.
१ जूनपासून आतापर्यंत ऊर्ध्व वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ५२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ७०० मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा पावसात तब्बल १७९ मिलिमीटरची घट झाली असून, त्याचा थेट परिणाम धरणे व प्रकल्पांच्या जलपातळीवर झाला आहे. याशिवाय अनेक ठिकाणी कमी पावसाची नोंद सुद्धा करण्यात आली आहे.






