
बारामती :स्व.अनंतराव पवार ऊर्फ तात्यासाहेब यांनी नेहमीच गावपातळीवरील राजकारणात चांगले काम करणा-यांना दिलासा देऊन खंबीर साथ देण्याचे काम केले,असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
पुणे व सातारा जिल्ह्यात जलसंधारणासह वृक्षसंवर्धन शैक्षणिक,कला क्रीडा व आरोग्य आणि समाजिक क्षेत्रातअग्रेसर असलेल्या शरयु फाउंडेशनच्या वतीने अनंतराव पवार सामाजिक पुरस्कारांचे वितरण बारामती शहरातील विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय आ.भरणे बोलत होते. यावेळी पद्मश्री राहीबाई पोपेरे,हरिचंद्र सुडे,कमल परदेशी,सलीम शेख,राजेश लोहाट ,कल्याणी भारंबे, नमिता कपाळे यांना त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सोहळ्यास सह्याद्री फार्म्स नाशिकचे चेअरमन विलास शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शरयु उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास पवार, फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार ,शरयु ऍग्रोचे सीईओ युगेंद्र पवार, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ए व्ही प्रभुणे, आ अशोक पवार, आ यशवंत माने, माजी आमदार रमेश थोरात, दिगंबर दुर्गाडे, शिवाजी काळे, दीपक तावरे आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवर शरयु परिवाराचे सर्व सहकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात फाउंडेशनच्या अध्यक्ष शर्मिला पवार यांनी
गेल्या काही वर्षात शरयु फौंडेशनने विविध क्षेत्रात पथदर्शी काम करत एक वेगळा नावलौकिक प्राप्त केला असल्याचे सांगून हे कार्य करत असताना समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी काम करणाऱ्याअनेक संस्थांचाही हातभार लागत असतो.
त्यामुळे अशा संस्थांचे कार्य समाजासमोर यावे या हेतूने शरयु फौंडेशनच्या वतीने अनंतराव पवार सामाजिक पुरस्कार देण्यात येतो. प्रास्ताविक शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी केले .यावेळी त्यांनी फौंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन शशांक मोहिते यांनी केले.
या पुरस्कार सोहळ्यानंतर प्रचंड लोकप्रियता मिळविलेल्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या मनोरंजन कार्यक्रमाचे बहारदार सादरीकरण करण्यात आले
या प्रसंगी विद्या प्रतिष्ठानचे गदीमा सभागृह गर्दीने तुडुंब भरले होते.
माझ्या राजकीय जीवनात श्रीनिवास पवारांचे मोठे योगदान: भरणे
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भाषणामध्ये शरयू फाउंडेशनने राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक करून श्रीनिवास पवार व शर्मिला पवार यांचे सामाजिक कार्य सर्वसामान्य जनता विसरणार नसल्याचे सांगून ते म्हणाले, माझ्या राजकीय जीवनामध्ये श्रीनिवास पवार यांचे मोठे योगदान आहे, त्यांचे हे योगदान आपण कधीही विसरू शकत नाही. चांगले काम करणाऱ्यांची दखल समाज नेहमी घेतो. शरयू फाउंडेशन ने अनेक शेतकऱ्यांना स्वखर्चाने विहिरी खोदून दिल्या आहेत, अनेक ठिकाणी ओढा खोलीकरणाचे काम करून दिले आहे. स्व. अनंतराव पवार यांनी देखील आपल्या जीवनामध्ये गरिबांविषयीची आस्था जपली. त्यांचे स्मरण कायम लक्षात राहणारे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.