
पावसाने दगा दिला, धाराशिवच्या खरीपावर संकट! जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाने शेतकऱ्यांची चिंता वाढली
धाराशिव/शीतलकुमार शिंदे : पावसाच्या लहरीपणाचा यंदा धाराशिवच्या खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. जून-जुलैमध्ये झालेल्या पावसानंतर ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली आणि त्यानंतर सप्टेंबरमध्येही पर्जन्यखंड कायम राहिला. परिणामी जिल्ह्यातील जवळपास ९५ टक्के खरीप क्षेत्रावर तीव्र आर्द्रता ताण निर्माण झाला असून, ८० ते ८५ टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान होण्याची शक्यता जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिलेल्या संक्षिप्त अहवालातून व्यक्त झाली आहे. पिके सुकून अकाली परिपक्वतेच्या अवस्थेत पोहोचल्याने आता पाऊस झाला तरी उत्पादनवाढीची शक्यता अत्यल्प राहणार आहे.
धाराशिव जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ६०३.१० मिमी आहे. मात्र, यंदा पावसाचे स्वरूप सुरुवातीपासूनच अनियमित राहिले. जूनमध्ये सरासरीच्या ९७.६० टक्के आणि जुलैमध्ये १००.१० टक्के पाऊस झाला. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने अचानक ओढ दिली. या महिन्यात केवळ ४३.१ मिमी म्हणजे २७.९० टक्के पाऊस झाला. सप्टेंबरमध्येही परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. १४ सप्टेंबरपर्यंत केवळ ६.८ मिमी म्हणजे ३.७ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जून ते १४ सप्टेंबरदरम्यान सरासरीच्या तुलनेत ४८.४९ टक्के पावसाची तूट राहिली आहे.
सलग ३५ दिवस पावसाचा खंड
ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील विविध भागांत सलग २९ ते ३५ दिवसांचा पर्जन्यखंड राहिला. सप्टेंबरमध्येही ७ ते १२ दिवस पावसाने पाठ फिरवली. जिल्ह्यातील ५७ महसूल मंडळांपैकी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यरत असलेल्या ४५ मंडळांच्या नोंदीत जूनमध्ये २२, जुलैमध्ये १२, ऑगस्टमध्ये २९ आणि सप्टेंबरमध्ये १७ दिवसांचा पर्जन्यखंड नोंदविण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत एकूण ८० दिवसांचा पर्जन्यखंड झाल्याने पिकांच्या वाढीच्या निर्णायक टप्प्यात जमिनीतील ओलावा कमी झाला.
सोयाबीनला सर्वाधिक फटका
यंदा जिल्ह्यात ५ लाख ३९ हजार २७ हेक्टरवर खरीप पेरणी झाली आहे. त्यात सोयाबीनचे क्षेत्र तब्बल ४ लाख ६७ हजार ३२२ हेक्टर, म्हणजे ८६.७० टक्के आहे. त्यापाठोपाठ तूर ३४ हजार ८३१ हेक्टर, उडीद २१ हजार ८८६ हेक्टर आणि मूग ५ हजार ५४४ हेक्टर क्षेत्रावर आहे. पावसाच्या दीर्घ खंडाचा सर्वाधिक परिणाम हलक्या जमिनीवरील सोयाबीन आणि उडीद पिकांवर झाला आहे. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे वाळली असून शेतकरी सोयाबीन उपटून जनावरांना चारा म्हणून देत आहेत. मध्यम ते भारी जमिनीवरील पिकांनाही फुलोरा, शेंगा किंवा कणसांची निर्मिती आणि दाणे भरण्याच्या प्रक्रियेत मोठा फटका बसला आहे.
आता पाऊस झाला तरी उत्पादन वाचण्याची शक्यता कमी
दीर्घकाळ पाऊस नसल्याने पिकांमध्ये तीव्र आर्द्रता ताण निर्माण झाला आहे. जवळपास ९५ टक्के क्षेत्रावरील पिके सुकून अकाली परिपक्वतेच्या अवस्थेत पोहोचल्याचे अहवालात नमूद आहे. या अवस्थेनंतर पाऊस झाला तरी पिकांची जैविक वाढ आणि उत्पादनाचे घटक पूर्ववत होण्याची क्षमता मर्यादित राहणार आहे. त्यामुळे उर्वरित काळात पाऊस झाला तरी उत्पादनातील झालेली घट मोठ्या प्रमाणात भरून निघण्याची शक्यता कमी आहे.
आयआयटी बॉम्बेच्या निरीक्षणानेही संकट अधोरेखित
आयआयटी बॉम्बेच्या अहवालानुसार, एमएनसीएफसीच्या निरीक्षणांच्या आधारे १ जून ते २१ ऑगस्टदरम्यान जिल्ह्याची पर्जन्यस्थिती ‘डिफिशियंट’ (-२० ते -६० टक्के) या वर्गात होती. तर ६ ते २१ ऑगस्टदरम्यान ती ‘स्कँटी’ (-६० ते -१०० टक्के) या गंभीर वर्गात नोंदविण्यात आली. मॉइश्चर अॅडिक्वेसी इंडेक्सनुसारही विविध तालुक्यांतील जमिनीतील उपलब्ध ओलाव्याची स्थिती प्रतिकूल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जलसाठेही चिंताजनक पातळीवर
पिकांवरील संकटाबरोबरच जिल्ह्यातील जलसाठ्याची स्थितीही चिंताजनक बनली आहे. जिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघु असे एकूण २२५ जलप्रकल्प आहेत. त्यांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ७२५.४० दलघमी असून सद्यस्थितीत केवळ ५५.०३० दलघमी म्हणजे आठ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
भूजल विकास यंत्रणेच्या ११४ निरीक्षण विहिरींच्या नोंदीनुसार सप्टेंबर २०२६ मध्ये सरासरी भूजलपातळी ९.५३ मीटर आहे. मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत त्यात ७.०२ मीटरची घट झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांपाठोपाठ आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचे संकटही अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट
एकीकडे पावसाअभावी खरीप पिके हातची जाण्याची स्थिती, तर दुसरीकडे घटता जलसाठा आणि खालावणारी भूजलपातळी, अशा दुहेरी संकटात जिल्ह्यातील शेतकरी सापडला आहे. प्रशासनाने २ सप्टेंबर रोजी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, आयआयटी बॉम्बेचे प्रतिनिधी आणि प्रगतिशील शेतकऱ्यांच्या सहभागातून मंडळातील किमान दोन गावांमध्ये प्रत्यक्ष पिकांची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
या पाहणी अहवालांमधून पावसाचे असमान वितरण, दीर्घ पर्जन्यखंड आणि ऑगस्टमधील अल्प पर्जन्यमानामुळे खरीप पिकांची स्थिती गंभीर झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता पाऊस येईल या आशेवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
दृष्टीक्षेपात
खरीप पेरणी : ५,३९,०२७ हेक्टर
सोयाबीन : ४,६७,३२२ हेक्टर
पिकांवरील आर्द्रता ताण : जवळपास ९५ टक्के क्षेत्र
संभाव्य पिकनुकसान : ८० ते ८५ टक्क्यांपेक्षा अधिक
जलप्रकल्प : २२५
उपयुक्त जलसाठा : ७२५.४० दलघमी
सद्य पाणीसाठा : ५५.०३० दलघमी (८ टक्के)
निरीक्षण विहिरी : ११४
भूजलपातळीत घट : ७.०२ मीटर