मुंबई – हा विजय माझे पती रमेश लटके यांचा आहे. त्यांनी त्यांची पूर्ण राजकीय कारकीर्दीत जी जनसेवा केली, त्याचीच पोचपावती म्हणजे हा विजय आहे. मतदारांनी त्याचीच परतफेड केली आहे, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी सर्वांचे आभार मानले. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झालाय. या निवडणुकीत ऋतुजा लटके यांचा विजय झालाय. ऋतुजा यांनी विजयानंतर अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.
रमेश लटके यांनी जी काही काम हाती घेतली होती, ती राहिली होती ती पूर्ण करणार आहे. अंधेरीचा विकास हेच माझे ध्येय आहे. उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वाद आणि आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्या साथ दिल्यामुळे मी जिंकले आहे. आता मातोश्रीवर जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच मी महाविकास आघाडीची उमेदवार आहे. हा विजय मविआचा आहे. मला उमेदवारी जेव्हा जाहीर झाली तेव्हापासून तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली आहे. त्यांचे मी आभार मानते.
माझ्या पतीचे निधन झाले. त्यामुळे ही पोटनिवडणूक झाली. मला खंत आहे की मला माझ्या पतीच्या जागेवर निवडणूक लढावी लागली. म्हणून जल्लोष होणार नाही. पण, आम्हाला नवे पक्षचिन्ह मिळाले, त्या चिन्हाखाली हा विजय आहे. त्याचा जल्लोष होईल, असेही त्या म्हणाल्या.