अकलुज : माढा लोकसभेसाठी (Madha Lok Sabha) खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी आणखी एक डाव टाकला आहे. २ दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची नागपूरला जाऊन भेट घेतलेले उत्तम जानकर शरद पवार यांच्या भेटीगाठी दाखल झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे माढा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील देखील जानकर यांच्यासह भेटीसाठी दाखल झाले होते. त्यामुळे माढ्यात भाजपला आणखी एक मोठा धक्का बसणार असे बोललं जात आहे.
उत्तम जानकर भाजपकडून सोलापूर लोकसभा लढवण्यास इच्छुक होते, मात्र भाजपचे सोलापुरातून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना तिकीट दिल्याने जानकर नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विशेष विमान पाठवून खासदार रणजितसिंह निंबाळकर, अमादार जयकुमार गोरे, आमदार शहाजी पाटील यांच्यासह उत्तम जानकर यांना तातडीने नागपूरला बोलावले होते.
यावेळी झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी जानकर यांना विधान परिषद किंवा विधानसभा, आता रान मोकळे तुम्ही मागाल ते देऊ, असे आश्वासन दिल्याचे उत्तम जानकर यांनी सांगितलं होते. मात्र यानंतरही जानकर पवार यांच्या भेटीला गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
माळशिरसमधून विधानसभेसाठी इच्छुक
देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आता उत्तम जानकर शरद पवार यांची भेट घेऊन त्यांची बाजू जाणून घेणार आहेत. दिनांक १९ एप्रिलला ते आपली राजकीय भूमिका ठरवणार आहेत. जानकर यांना आगामी विधानसभा निवडणूक माळशिरसमधून लढवायची आहे. यासाठी त्यांना मोहिते पाटील यांची गरज आहे. तर, माढा लोकसभेसाठी मोहिते पाटील यांना उत्तम जानकर यांच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे जानकर यांच्या निर्णयाचा मोठा परिणाम माढ्याच्या राजकारणावर होणार आहे.