ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामास मंजुरी; पुणे जिल्ह्यातील 'या' 25 गावांचा समावेश
पुणे/ निलेश राऊत : बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाने पुणे जिल्ह्यातील 25 ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामास मंजुरी दिली आहे. यासाठी या ग्रामपंचायतींना प्रत्येकी 20 ते 25 लाख रूपये ग्रामविकास विभाग राज्य शासनाकडून देण्यात येणार आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यात 5 कोटी 45 लाख रूपये वितरित केले जाणार आहेत.
राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनंतर्गत ग्रामीण भागासाठी पायाभूत सुविधांची असणारी आवश्यकता व त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या स्रोतांची मर्यादा विचारात घेऊन बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेच्या निधी निकषात बदल करुन मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार शासनाकडे मिळालेल्या प्रस्तावानुसार पुणे जिल्ह्यातील 25 ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय बांधण्यास मान्यता देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शासनाचे उपसचिव प्रशांत पाटील यांनी आदेश पारित केले आहेत.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे सहा ग्रामपंचायतींना नवीन इमारत बांधण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. तर त्यापाठोपाठ दौंड तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींना मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता देताना काही नियम व अटीही लागू केल्या आहेत. यामध्ये सदर इमारतीच्या बांधकामामध्ये ग्रीन बिल्डींग संकल्पना अंमलात आणून, नैसर्गिक प्रकाशयोजना व वायुवीजन, पाण्याच्या व उर्जेच्या वापरात काटकसर, पर्जन्य जलपुनःर्भरण आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य व साधन-सामुग्रीचा वापर करणे आवश्यक राहणार आहे.
इमारत बांधकामाचे काम हाती घेतल्यापासून जास्तीत जास्त एक वर्षात पूर्ण करावे, तसेच ग्रामपंचायतींनी स्वतःच्या कार्यालयाचे बांधकाम करावयाचे असल्यास प्रथम ग्रामसभेचा ठराव करुन लोकसंख्येच्या टप्याप्रमाणे शासनाने निश्चित केलेल्या बांधकाम मुल्यांनुसार ग्रामपंचायतींनी याबाबतचा ठराव संमत केल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीनी स्वतःचे कार्यालय उपलब्ध नसल्याची तसेच कार्यालय बांधण्यासाठी जागा उपलब्ध असल्याची खात्री केल्यानंतर जिल्हा परिषदेने अंतिम मंजूरी प्रदान करावी, असेही सुचित करण्यात आले आहे.
तालुक्याचे नाव व ग्रमापंचायत तसेच वितरित निधी
भोर : 1) करंदी खुर्द : 20 लाख
2) हिडोशी : 20 लाख
3) कोर्ले : 20 लाख
दौड :
1) पिंपळगाव : 20 लाख
2) नानगाव : 25 लाख
3) राजेगाव : 25 लाख
4) देऊळगाव गाडा : 25 लाख
5) देवकरवाडी : 20 लाख
हवेली :
1) कोलवडी साष्टे : 25 लाख
2) कदमवाकवस्ती : 25 लाख
जुन्नर :
1) हडपसर : 20 लाख
2) माणिकडोह : 20 लाख
3) देवळे : 20 लाख
4) खटकाळे : 20 लाख
5) आंबेगव्हाण : 25 लाख
6) रोहोकडी : 20 लाख
मावळ :
1) टाकावे खुर्द : 20 लाख
2) कुसगाव बु. : 25 लाख
3) सांगिसे : 20 लाख
4) घोणशेत : 20 लाख
मुळशी :
1) हाडशी : 25 लाख
शिरुर :
1) सदरवाडी : 20 लाख
2) खैरेनगर : 20 लाख
3) चांडोह : 20 लाख
वेल्हे :
1. मांगदरी : 20 लाख