गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील पक्षचिन्ह धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा प्रकरणाची अंतिम सुनावणी आज सर्वोच्च न्यायालात पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणीत कोणाचा विजय होणार याची उत्सुकता वाढली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि पक्षाच्या चिन्हाबाबतच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती.यासंबंधी आज (ता. ८) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मात्र, सुनावणी होण्यापूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी एक्सवर पोस्ट करून मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.
असीम सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, ‘ शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण जस्टीस सूर्यकांत यांच्या बेंचसमोर आज 16 नंबरला लागलेले असल्याने ते प्रकरण सुनावणीसाठी रिच होणार हे नक्की परंतु एका इतर एका अर्धवट सुनावणी झालेल्या प्रकरणातील बेंचचे सुद्धा जस्टीस सूर्यकांत सदस्य न्यायाधीश आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होईल का असे प्रश्नचिन्ह आहे.’ असं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. पण त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यातर्फे असे प्रयत्न होतीलच की सुनावणी पुढे ढकलली जावी.’ असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.
असीम सरोदेंच्या या संशयामुळे आजची सुनावणी अंतिम ठरणार की पुन्हा एकदा सुनावणीची तारीख पुढे ढकलणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या तीन वर्षांत अनेकदा तारखांवर तारखा पडल्याने या पक्षचिन्हाच्या सुनावणीला ती वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाबाबत अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर या प्रकरणी अंतिम निकाल लागणार का, असा प्रश्ननही उपस्थित केला जात आहे.
Local Body Election 2025: राज्यातील ‘मिनी विधानसभा’ निवडणुकांसाठी महायुती सज्ज; इलेक्शनसाठी
दरम्यान, यापूर्वी याचिकेवर १४ जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली होती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जुलै महिन्यात न्यायालयात याचिका दाखल करून “शिवसेना नाव आणि चिन्हाच्या वादावर लवकर निर्णय द्या” अशी मागणी केली होती. सुनावणी वेळी न्या. सूर्यकांत आणि न्या. बागची यांच्या खंडपीठाने मुख्य याचिकेवर ऑगस्टमध्ये सुनावणी घेणे योग्य राहील. असे सांगितले होते. मात्र राष्ट्रपती-राज्यपाल वादातील खटल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर पडली. आता आज न्या. सूर्यकांत आणि न्या. बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी अंतिम निर्णयासाठी येत आहे.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांत होणार आहेत. त्यामुळे “खरी शिवसेना” कोणाची हे स्पष्ट होणे निर्णायक ठरणार आहे. जर धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडेच राहिले, तर त्यांना निवडणुकांत मोठा फायदा होईल. तर न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय दिला, तर राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडी सुरू होण्याची शक्यता आहे.