बारामती : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Dr. Appasaheb Dharmadhikari) यांच्या बनावट पत्रासंदर्भात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याला त्याचा संबंध नसताना त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी केला असून, पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करावा, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा लोकशाही मार्गाने संभाजी ब्रिगेड स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा गायकवाड यांनी दिला.
यासंदर्भात प्रवीण गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. यामध्ये ते म्हणतात, संभाजी ब्रिगेड ही शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांच्या विचारधारेला अनुसरून काम करणारी संघटना आहे. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते त्याच विचारधारेचा प्रचार आणि प्रसाराचे काम करतात. विद्यमान राज्य सरकारने नुकताच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण दिला आहे. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमावेळी खारघर येथे जवळपास 14 निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेला सर्वस्वी आप्पासाहेब धर्माधिकारी आणि राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत. परंतु, झालेल्या घटनेची जबाबदारी झटकण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेत त्यांच्याविषयी रोष निर्माण झाला आहे. या रोषातून अज्ञात व्यक्तीने आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचे बनावट पत्र तयार करून ते सामाजिक माध्यमांवर व्हायरल केले. त्या पत्रामध्ये पुढील निवडणुकांमध्ये शिंदे-फडणवीस सरकारला मतदान करु नका, असे आवाहन केले आहे. या पत्रामुळे आपली बदनामी झाल्याची तक्रार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पोलिसांकडे केली होती.
राज्याचे गृहखाते आणि पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास न करता केवळ कारवाई केल्याचे दाखवण्यासाठी घाईघाईने पुण्यातून एका होतकरू तरुणाला अटक करून त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. अटक करण्यात तरुण हा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे. या तरुणाचा त्या बनावट पत्राशी कुठलाही थेट संबंध नाही. हे बनावट पत्र तयार करणारे नामानिराळे राहिले आणि विनाकारण एका सर्वसामान्य तरुणाला यात गोवण्यात आले आहे.
आप्पासाहेब धर्माधिकारी आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात वैचारिक मतभेद आहेत. सद्गुरू बैठकांच्या नावाखाली अनैतिहासिक मांडणी करुन अंधश्रद्धा पसरवण्याला आणि लोकांच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेऊन त्यांची लुट करण्याला आमचा विरोध आहे. खारघर येथे झालेल्या निष्पाप लोकांच्या मृत्यूबद्दल किंचितही लवलेश नसणारे धर्माधिकारी आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी ओढूनताणून संभाजी ब्रिगेडसोबत या घटनेचे कनेक्शन जोडायचे, या हेतूने आमच्या कार्यकर्त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. संभाजी ब्रिगेड या तरुणाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून कुठल्याही परिस्थितीत एका निर्दोष तरुणावर कारवाई आम्ही खपवून घेणार नाही. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी कधीही वैचारिक मुद्द्यावर मुकाबला करावा, आम्ही त्यांना सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा प्रवीण गायकवाड यांनी दिला आहे.
कार्यकर्त्यांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न करु नये
राज्याचे गृहखाते आणि पोलिस प्रशासनाला विनंती आहे की, प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन तपास करावा. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा लोकशाही मार्गाने आणि संभाजी ब्रिगेड स्टाईलने आम्हाला याविरुद्ध लढा उभा करावा लागेल.
– प्रवीण गायकवाड, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ,संभाजी ब्रिगेड.