टोप मध्ये लहान मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न घटनेने परिसरात खळबळ
शिरोली : टोप येथील दक्षिणवाडीमध्ये राहणाऱ्या आयुष अर्जुन पाटील या 10 वर्षीय अल्पवयीन मुलाचा काही अज्ञातांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. रत्नागिरी-नागपूर हायवेवर टोप येथील दक्षिणवाडी हद्दीमध्ये लहान मुले गुरुवारी दुपारी क्रिकेट खेळत होती. अचानक दुपारी सफेद कलरची ओपन टफ जीप त्याठिकाणी आली आणि त्यांनी आयुष यास गाडीत घालून पळवून नेले.
या घटनेनंतर त्याच्यासोबत खेळणाऱ्या लहान मुलांनी आरडाओरडा केला असता शेजारील शेतामध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. त्या गाडीचा पाठलाग केला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारांना पाठलाग करणाऱ्या नागरिकांनी माहिती दिली. त्यांनी तात्काळ या गाडीचा पाठलाग केला. त्या जीपला ओव्हरटेक करून गाडी थांबवली. त्यानंतर तात्काळ अपहरणकर्त्यांनी त्या मुलास जीपमधून खाली फेकून दिले व सुसाट वेगाने गाडी शिये फाट्याच्या दिशेने पळवली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर न्यू यॉर्क टाईम्सचा वादग्रस्त अहवाल; अमेरिकन समितीकडून तीव्र प्रतिक्रिया
त्या गाडीचा ग्रामस्थांनी शिये फाट्यापर्यंत पाठलाग केला असता गाडी मिळून आली नाही. ती गाडी कसबा बावडा या दिशेने निघून गेल्याचे पाठलाग करणाऱ्या युवकांनी सांगितले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर लहान मुले भेदरलेली होती. ही गाडी यापूर्वी दोन-तीन वेळा या परिसरात येऊन गेल्याचे लहान मुलांनी सांगितले. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून, या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.
हेदेखील वाचा : India-Pakistan: ‘सिंधूमध्ये एकतर पाणी वाहील नाहीतर त्यांचे रक्त…’ पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टोंनी भारतविरोधात गरळ ओकली