वाशिम : गेल्या १५ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. कारण १५ दिवसांपूर्वी आलेल्या पावसात काही शेतकऱ्यांनी पेरणी उरकली. कारण, हवामान खात्यांच्या अंदाजानुसार मुबलक पाणी पडणार, असे भाकीत होते. एवढेच नाही तर भेंढवळ मांडणीतूनही यावेळी मान्सून वेळेवर असे भाकीत आता हवेत विरले त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला तोंड दयावे लागणार अशी वेळ आली होती. कारण शेतकऱ्यांनी ५० टक्के पेरण्या आटोपल्या होत्या पावसाळा वेळेवर त्यामुळे शेतकऱ्यांनी एवढे महागाचे बियाणे पेरण्यासाठी धडपड करुन पेरणी केली होती. वाशिम, मालेगाव, रिसोड, येथे पावसाने दमदार हजेरी लावली तर मंगरुळपीर, मानोरा, कारंजा, या तालुक्यात तुरळक पावसाने हजेरी लावून पिकांना संजीवनी दिली. या तिन्ही तालुक्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
१५ दिवसाचा कालावधी गेल्याने वातावरणात अधिक गर्मी वाढली. त्यामुळे शेतातील पिके अखेरच्या घटका मोजत होते. तापमान कमी होण्याऐवजी उन्हाळया प्रमाणे अंगाची लाही लाही. एवढे गर्मीचे वातावरण घरातून निघणे कठीण झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आशा सोडली होती मात्र दुबारपेरणीचे संकट हे वरुण राजाने टाळल्याने आता शेतकरी वर्गात खुशीचे वातावरण पसरले आहे. वरुणराजाला शेतकऱ्यांची दया आली असावी, त्यामुळे दि ३० जुनला दुपारी ६.३० वाजता एक तास पाउस पडला. त्यामुळे पिकांना संजीवनी मिळाली. रात्री १२ ते २ या दरम्यान पुन्हा पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या सुकत असलेल्या पिकांना नवसंजीवनी दिली.