
अतुलबाबांचे धक्कातंत्र, विरोधकांमध्ये खळखळ; आजी-माजी पालकमंत्र्यांना टशन
नगराध्यक्षपदासाठी खुले आरक्षण जाहीर झाल्यापासून कराडच्या राजकारणात उकळी येऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक स्थानिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेशाची जणू चळवळच हाती घेतली असून, त्यामागे आमदार भोसले यांची योजनाबद्ध राजकीय रणनीती स्पष्टपणे दिसून येते. १४ ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या पहिल्या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार भोसले यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेविका स्मिता हुलवान यांना भाजपात प्रवेश देत पहिला राजकीय धक्का दिला होता. यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी, ‘आम्ही फोडाफोडीची स्पर्धा लावणार नाही, पण संयम गमावला तर आमची भूमिकाही ठरेल’, असा इशारा दिला होता. मात्र, अवघ्या दोन आठवड्यांतच २८ ऑक्टोबर रोजी आमदार भोसले यांनी दुसरी मोठी चाल खेळली. माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे निकटवर्तीय, माजी नगरसेवक शिवाजीराव पवार यांना भाजपात दाखल करून राष्ट्रवादीलाही धक्का दिला. या खेळीचा प्रभाव केवळ पक्षांतरापुरता मर्यादित न राहता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समिती, कृष्णा आणि सह्याद्री साखर कारखाने या सत्ता समीकरणांवरही उमटेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुख्य पक्षांच्या तटबंदीवर थेट तोफ
भाजपच्या सलग दोन पक्षप्रवेश सोहळ्यांनंतर आजी-माजी पालकमंत्री आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. कराडच्या राजकारणातील ही सलग हालचाल, आगामी नगरपालिका निवडणुकीपूर्वीचा निर्णायक टर्निंग पॉइंट ठरू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकूणच, डॉ. अतुल भोसले यांनी धक्कातंत्रातून कराडमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही मुख्य पक्षांच्या तटबंदीवर थेट तोफ डागली आहे. त्यांच्या पुढील ‘खेळी’कडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
माजी मुख्यमंत्र्यांनाही थेट शह!
डॉ. अतुल भोसले यांच्या दुसऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यात काँग्रेसलाही धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रभावाखाली असलेली जनशक्ती आघाडी संपूर्णपणे भाजपात दाखल झाली आहे. माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर आणि आप्पा माने यांच्या प्रवेशानंतर कराडच्या काँग्रेस समर्थक गोटात खळबळ माजली असून, हा टर्निंग पॉइंट स्थानिक राजकारणात मोठे चित्र बदलू शकतो, असे राजकीय सूत्रांचे मत आहे.
जनशक्तीचे राजकारण संपुष्टात?
कराडच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा शारदा जाधव, जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव आणि उपाध्यक्ष अतुल शिंदे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या हालचालींमुळे काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघात भगवी लाट उसळण्याची शक्यता व्यक्त होत असून, जनशक्ती आघाडीचे राजकारण संपूर्णपणे संपुष्टात येईल का, हा प्रश्न आता कराडच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.