बॅलेट पेपरवर मतदान घ्या, नाहीतर आम्ही...; काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या इशारा
सोलापूर : लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवत देशात अराजक पद्धतीने राजकारण सुरु आहे त्याला विरोध करण्याचा मार्ग मारकडवाडीने देशाला दाखवून दिला आहे. ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी मारकडवाडीने सुरु केलेल्या आंदोलनाची देशाने दखल घेतली असून, आता हे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर जाईल व जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहिल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम घोटाळ्याविरोधात सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीने बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी आंदोलन सुरु केले, त्या गावाला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट दिली. या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार रामहरी रुपनवर, प्रा. यशवंत भिंगे, सुर्यवंशी, पवार आदींचा समावेश होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकरही उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा : नाना पटोलेंचा भाजपला इशारा; म्हणाले, आमच्या नेत्यांची बदनामी कराल तर…
माकरडवाडीच्या ग्रामस्थांची भेट घेल्यानंतर अतुल लोंढे म्हणाले की, मारकडवाडीची माती ही फक्त माती नाही तर भारतमाता असून, गावकऱ्यांनी भारतमातेची सेवा केली आहे. महात्मा गांधींच्या चंपारण्य आंदोलनापेक्षा मारकडवाडीच्या आंदोलनाचे महत्व जराही कमी नाही. देशाची लोकशाही वाचवण्यासाठी मारकडवाडीने खरा मार्ग दाखवला आहे. ईव्हीएम व सर्व सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून मते चोरून लोकशाही संपवण्याचा प्रकार सुरु आहे त्याविरोधात मारकडवाडीने आंदोलन छेडले आहे. आता बॅलेट पेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असेही अतुल लोंढे यांनी आश्वस्त केले.
मारकडवाडी गाव चर्चेत
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये जोरदार राजकारण रंगले. मात्र सोलापूरमधील मारकडवाडीमध्ये ईव्हीएमद्वारे पार पडलेल्या मतदानावर संशय व्यक्त करण्यात आला होता. गावाने केलेल्या मतदानात आणि लागलेल्या निकालात तफावत आढळून येत आहे. त्यामुळे संपूर्ण गावाने आपल्या खात्रीसाठी पुन्हा एकदा मतदान घ्यायचे ठरवले होते. विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतमोजणीवर शंका घेत मारकडवाडी गावातील काही ग्रामस्थांनी आपल्या गावापुरते फेर मतदान घेण्याचा घाट घातला होता. याला पोलीस प्रशासनाकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. गावात मतदान होऊ नये यासाठी गावात 144 कलम लावण्यात आले होते. आता या प्रकरणातील संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल गांधी मारकडवाडीत येणार
ईव्हीएमच्या मुद्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ईव्हीएमवर आंदोलन उभारण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. आता, ईव्हीएमविरोधातील लाँग मार्च हा मारकडवाडीतून काढण्यात येणार आहे. या लाँग मार्चची सुरुवात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी करणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी ही माहिती दिली.