2 तारखेच्या आधी आरोपींना अटक करा, नाहीतर मी...; खासदार बंजरंग सोनावणेंचा अल्टिमेटम
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेवरुन सध्या राजकारण तापले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादीचे आमदार जितेद्र आव्हाड यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आमदार, खासदार सहभागी झाले होते. या घटनेचा मुख्य सुत्रधार अटक करावा, अशी मागणी मोर्चेकरांनी केली आहे. यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी इशारा दिला आहे.
सोनवणे नेमकं काय म्हणाले?
संतोष अण्णाला न्याय मिळण्यासाठी आपण लढत आहे. अजूनही त्यांच्या हत्येच्या प्रकरणात सर्व आरोपींना अटक झालेली नाही. ज्यादिवशी आम्ही गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली तेव्हा खंडणीचा गुन्हा दाखल झाला. या ‘आका’ चा मास्टरमाईंड धनंजय मुंडे आहे. मुंडे साहेबांना मंत्रिमंडळात राहाण्याचा अधिकार नाही अशी मागणी यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले सत्ताधारी याला जातीय राजकारण म्हणत आहेत. आज आम्ही सर्व पक्षीय एकत्र आलो आहोत. यांना पद काय आम्हाला मारायला पाहीजेत काय? याचा नाव घ्यायचे नाही, हा कोण मोठा लागून गेला आहे. हा दलाल आहे असेही खासदार बजरंग सोनावणे यांनी यावेळी म्हटले. धनंजय मुंडे साहेब तुम्हाला बीडला न्याय द्यायचा असेल, या मातीत तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जा. तुम्हाला मंत्रिपद कशाला पाहिजे. फक्त आम्हाला मारायला? असा सवाल बजरंग सोनावणे यांनी यावेळी विचारला.
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी द्याच, सीआयडी आणि एसआयटीकडे चौकशी दिलेली आहे. पण ते अधिकारी कोण आहेत हे कोणालाच माहिती नाही. वाल्मिकी कराडवर हत्येचा 302 चा गुन्हा दाखल करा, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या. तरच न्याय होईल. राजकारण नको. या नवीन वर्षात 2 तारखेपर्यंत अटक झाली नाही तर दिल्ली असो की महाराष्ट्र असो की बीड मी उपोषणाला बसणार आहे, असेही खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा : धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार? ‘या’ बड्या मंत्र्याचं सूचक विधान
नेमकं प्रकरण काय?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता हा मुद्दा देशभरात गाजताना दिसत आहेत.