मुलाची रणनीती अन् वडिलांचा विजय; बापू पठारे यांना अश्रू अनावर
पुणे : राज्यभरासह पुणे अन् पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि भाजपचा झंझावात असताना पुण्यात मात्र एका तरुणाने आपल्या रणनीतीच्या जोरावर वडिलांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे विजयी झाले. विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा ५ हजार मतांच्या फरकाने पराभव झाला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांना मुलाचे नाव घेताना अश्रू अनावर झाले. त्यांनी मतदारांचे आभार मानले.
माजी आमदार असलेले बापूसाहेब पठारे गेल्या दोन निवडणुकांमधून बाहेर होते. ग्रामपंचायत ते विधानभवन असा प्रवास करणारे बापूसाहेब पठारे यांची नागरिकांशी चांगली नाळ जुळलेली आहे. परंतु, काही कारणास्तव ते २०१४ आणि २०१९ च्या निवडणूकातून बाहेर राहिले. त्याठिकाणी एकवेळा भाजपचे योगेश मुळीक आणि गेल्या निवडणूकीत सुनिल टिंगरे यांनी विजय मिळवला होता. बापूसाहेब पठारे हे २०१९ ची निवडणूक पार पडल्यानंतर पुन्हा राजकारणात सक्रीय झाले होते.
विधानसभा निवडणूकी काही महिन्यांपुर्वीच राष्ट्रवादीत फूट पडली अन् बापूसाहेब पठारे यांनी भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार गट) प्रवेश केला. तेथून तिकीट घेत उमेदवारी देखील मिळविली. तेव्हापासूनच सुरेंद्र पठारे यांनी विजयाच्या निश्चयाने कामकाजाला सुरूवात केली होती. गेल्या दीड महिन्यांपासून पायाला भिंगरी लावून फिरत असलेल्या सुरेंद्र पठारे यांनी अखेर वडिलांच्या हातात विजय टाकत वडगाव शेरीसाठी किंग मेकरची भूमिका बजावली आहे. यासोबतच पुढील राजकारणातील “किंग” म्हणून पाऊल देखील ठेवले असे म्हणता येईल.
हे सुद्धा वाचा : ऐतिहासिक वाघनखे आणखी किती दिवस पाहता येणार? मोठी माहिती आली समोर
सुनिल टिंगरे यांचा पराभव
विधानसभा निवडणुकीसाठी सुनिल टिंगरे हे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढवीत होते. मात्र काही महिन्यांपूर्वी झालेले पोर्शे कार अपघात प्रकरण त्यांच्यासाठी अडचणीचे ठरले. निवडणूक प्रचारात या प्रकरणाचा वापर करून विरोधक त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत होते.. या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसतानाही विनाकारण याचे राजकारण केले जात असल्याने टिंगरे यांनी माझी बदनामी केली तर न्यायालयात खेचीन असा इशारा दिला होता. कुठेतरी हे याचा परिणाम मतांवर झाल्याची चर्चा मतदारसंघात आहे.
पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) उमेदवार बापू पठारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) सुनील टिंगरे यांच्यातील लढत चुरशीची झाली. अत्यंत चुरशीच्या या लढतीत सुनील टिंगरे यांचा पराभव झाला आहे. बापू पठारे यांचा पाच हजार मतांनी विजय झाला आहे. कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरण सुनील टिंगरेंना भोवले आहे.