Kolhapur News: 'खंडपीठ आमच्या हक्काचं,नाही कुणाच्या बापाचं! कोल्हापुरात खंडपीठ करण्याच्या मागणीसाठी वकीलांची महारॅली
कोल्हापूर : खंडपीठ आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं.! .कोल्हापुरात खंडपीठ झालंच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी करत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने शहरात महारॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन या मागणीचे निवेदन दिले. सदरचे हे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वीकारले. सकाळी निघालेल्या या रॅलीत संपूर्ण जिल्ह्यातील वकिलास सहा विविध संघटनांच्या पदाधिकारी यांनी या रॅलीत सहभागी झाली होते. सदरचे निवेदन तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवावे असे आव्हानेही वकिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना केले.
मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांना निवेदन देऊन महारॅलीची सुरुवात झाली. पितळी गणपती धैर्यप्रसाद हॉल, ताराराणी रोड ,स्टेशन रोड, व्हिनस कॉर्नर ,बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही रॅली दसरा चौकात आली. दसरा चौकात उपोषणास बसलेल्या माणिक पाटील – चुयेकर यांची भेट घेऊन ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आगेकूच झाली. पदाधिकाऱ्यांच्या सह शिष्ट मंडळ आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तीन वेगवेगळ्या प्रतीचे निवेदन दिले. तसेच सर्व निवेदन मुख्यमंत्र्यांनी पाठवून द्या. त्यांचा पाठपुरावा करा अशी त्यांना विनंती केली.
जिल्हाधिकारी कार्यालयावर ही रॅली आल्यानंतर प्रवेश दारावर वकीलांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि या प्रश्नाकडे लक्ष वेधले. यावेळी वकिलांसह विधी महामंडळाचे विद्यार्थी आणि काही संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. सहा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा सहभाग आजच्या या महारॅलीत होता. कोल्हापूर सह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग येथील बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन खंडपीठ मागणीसाठी आपली ताकद दाखवून दिली.
पायाभूत सुविधा चांगल्या, खंडपीठ कोल्हापुरातच करा आमदार सतेज पाटील यांची मागणी
कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी यासह बाकीच्या जिल्ह्यांतील लोकांना न्यायालयीन कामकाजासाठी मुंबईला जावे लागते. या सातही जिल्ह्यातील लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापुरातच खंडपीठाची मागणी सातत्याने उचलून धरली आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. खंडपीठासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा कोल्हापुरात चांगल्या आहेत. भौगोलिक दृष्ट्या कोल्हापूर सगळ्यांना सोयीस्कर आहे. मुंबई हायकोर्टात जवळजवळ दोन लाख केसेस या सात जिल्ह्यांतून आहेत. त्यामुळे कोल्हापूर हे सर्वांना सोयीस्कर पडणारे ठिकाण असून खंडपीठ कोल्हापुरातच व्हावे, अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली.