बारामती – आगामी लोकसभा निवडणूकीसाठी (Lok Sabha elections 2024) सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. नेत्यांचे पक्षांतर देखील वाढले असून विलोधक व सत्ताधारी आपापली तयारी जोमाने करत आहेत. दरम्यान, राज्यामध्ये देखील लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. महायुतीने पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या तिसऱ्या टर्मसाठी कंबर कसली आहे. यामध्ये बारामती लोकसभेचे (Baramati Loksabha) जागा लक्षवेधी ठरत आहे. कारण येथे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये (Sunetra Pawar) लढत होण्याची शक्यता आहे. यामुळे बारामती शहरामध्ये ठिकठिकाणी या नंनद भावजय यांचे पोस्टर लागले असून यामुळे बारामती पोस्टरच्या रंगात रंगली आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष बारामती लोकसभा निवडणूकीकडे लागले आहे. शरद पवार गट व अजित पवार गटासाठी बारामती लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला आहे. या जागेवर सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याचे बोलले जात आहे. यामुळे बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांचा प्रचार रथ फिरत आहे. या प्रचार रथाच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांच्या कार्याची माहिती दिली जात आहे. त्यासाठी गाडीवर सुनेत्रा पवार यांचे फ्लॅक्स लावण्यात आले आहे.
त्याचबरोबर विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची देखील तयारी सुरु झाली आहे. सुनेत्रा पवारानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचा विकास रथ तयार झाला आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विकास कामाचा रथ आता बारामतीमध्ये फिरू लागला आहे. या रथाच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये मांडलेले प्रश्न आणि केलेली कामे ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. फक्त शहरी भागामध्ये नाही तर गावागावांमध्ये हा रथ फिरवला जात आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांच्या विकासकामांची यादी वाचली जात आहे. दोन्ही उमेदवारांसाठी जोमात तयारी सुरु असून प्रचारासाठी फ्लॅक्स लावण्यात येत आहे. तसेच रथ देखील फिरवले जात आहेत.