Baramati police take action against overloaded dumper trucks Pune News Update
बारामती : रविवारी बारामतीमध्ये डंपरखाली येऊन वडील आणि दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे बारामतीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. यानंतर आता पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. बारामती शहर व परिसरात ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि हायवा वाहनांवर अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड आणि बारामती वाहतूक शाखेचे निरीक्षक चंद्रशेखर यादव शहर पोलिस निरीक्षक विलास नाळे यांना सोबत घेऊन मोठी कारवाई करत एकूण १४ वाहने जप्त केली आहेत. या सर्व वाहनांवर खटले तयार करून ते प्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती यांच्याकडे पाठविण्यात आली असल्याची माहिती चंद्रशेखर यादव यांनी दिली.
बारामती शहरातील खंडोबा नगर या ठिकाणी रविवारी झालेल्या भीषण अपघातात वडीलांसह दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने बारामती परिसरातील बेफिकीरपणे अवजड वाहने चालवणाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या संदर्भात समाज माध्यमांवर देखील तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून या कारवाईचे स्वागत बारामती शहरातील नागरिकांनी केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बारामती परिसरात मोठ्या प्रमाणावर खडी, मुरूम व इतर बांधकाम साहित्याची वाहतूक ट्रकमधून होत असते. मात्र, या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन भरले जात असल्याने रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, तसेच अपघात ही होत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करत पोलिसांनी ही कठोर कारवाई केली आहे. जप्त केलेली वाहने २ ते १० टनांपर्यंत ओव्हरलोड आढळून आली आहेत. यामध्ये प्रत्येक वाहनावर मोठा दंड होण्याची शक्यता आहे. सर्व वाहने बारामती वाहतूक शाखेच्या कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. पोलीस प्रशासनाने सर्व वाहनचालकांना याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले असून, यापुढेही अशाच प्रकारची कारवाई सातत्याने राबवली जाणार असल्याचा इशारा दिला आहे.
पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, विलास नाळे तसेच बारामती वाहतूक शाखेचे सुभाष काळे, प्रदीप काळे, माया निगडे, रूपाली जमदाडे, प्रज्योत चव्हाण, बारामती पोलिस स्टेशन चे ओंकार सीताप, स्वाती काजळे, अजिंक्य कदम यांनी केली आहे.
याबाबत अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार म्हणाले की, ‘गेली अनेक महिन्यापासून बारामती वाहतूक शाखा वाहतुकीचे नियम रुजवण्यासाठी कारवाया करत आहे. तरीही अपघातात मृत्युमुखी पडणेचे प्रमाण चिंताजनक आहे.नागरिकांनी , वाहनचालकांनी सजग राहून वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड म्हणाले की, काही वाहन चालक नियम मोडून नियम ओव्हरलोड वाहने चालवतात. यामुळे शाळेतील विद्यार्थी, वृद्ध, ग्रामस्थांना धोका निर्माण होतो.वाहतुकीत शिस्त आणि सुरक्षितता यासाठीच मोहीम राबवली जात आहे.’ अशी माहिती राठोड यांनी दिली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले की, “ओव्हरलोड वाहने चालवणे म्हणजे केवळ कायद्याचे उल्लंघन नाही, तर इतरांच्या जिवाशी खेळ आहे. सर्व वाहनचालक, वाहनमालक व ठेकेदारांनी जबाबदारीने वागावे. आम्ही कारवाई करत आहोत ती फक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नव्हे, तर जनतेच्या सुरक्षेसाठीही आहे.यापुढे अशीच मोहीम अधिक तीव्रतेने राबवली जाईल.” असा आक्रमक पवित्रा चंद्रशेखर यादव यांनी घेतला आहे.