बारामती : महाराष्ट्रात नंबर एकचा तालुका कोणता असेल तर तो बारामती असेल, त्यामुळे बारामती तालुका राज्यात नंबर एक करण्यासाठी बारामतीकरांच्या सहकार्याची गरज असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भक्कम पाठिंब्याची गरज आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हजेरीत बारामतीकरांना साद घालत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना साकडे घातले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अजित पवार यांच्या या मागणीला पाठिंबा दर्शवत तिजोरीची चावी तर तुमच्याच हातात असून बारामतीयांच्या विकासासाठी हात आखडता घेणार नसल्याचे आश्वासन बोलताना दिले.
विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या नमो महा रोजगार मेळाव्याचे उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्योजकता विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत , आमदार दत्तात्रय भरणे, डॉ नीलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय पाटील त्यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार यांच्या या कार्यक्रमाच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून उपस्थितांचे तसेच माध्यमांचे लक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे लागले होते. या पार्श्वभूमीवर उपस्थित प्रमुख नेते काय बोलतात याची उत्सुकता देखील सर्वांना लागली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे बारामती शहर व तालुक्याच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी मिळाला. बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर या ठिकाणी ६६ एकर क्षेत्रामध्ये पोलीस उप मुख्यालय इमारत इमारत, राज्यात नंबर एकचे बस स्थानक , बारामती पोलीस ठाण्याची सुसज्ज इमारत, पोलीस वसाहत इमारत यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आल्याने बारामतीच्या वैभवात भर घालणाऱ्या अत्याधुनिक वास्तू उभा करता आल्या. येत्या काही दिवसांमध्ये बारामती तालुका महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा तालुका करण्याचा आपला प्रयत्न आहे, यासाठी बारामतीकरांचे सहकार्य आवश्यक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भक्कम पाठिंबाची यासाठी आवश्यकता असल्याचे अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या वक्तव्याचा धागा पकडत, बारामती तालुका नंबर एकचा करण्याचे अजितदादांचे स्वप्न आहे, राज्याच्या तिजोरीची चावी अजित दादांकडे आहे, आम्ही देखील बारामतीच्या विकास कामासाठी कधीही हात आखडता घेणार नसल्याचे आश्र्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हजेरीत अजित पवार यांनी बारामती नंबर एकचा तालुका करण्याचे स्वप्न बोलून दाखवल्यानंतर उपस्थित बारामतीकरांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या या वक्तव्याचे स्वागत केले.
मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांचे देखील कौतुक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीस बारामतीच्या विकासामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगत पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील महत्त्वाचे योगदान बारामतीच्या विकासात असल्याचे आपल्या भाषणात सांगितले.
बारामतीच्या विकासाठी हात आखडणार नाही : मुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीस महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा उल्लेख करत त्यानंतर महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री अजित पवार असा नामोल्लेख करत आपल्या भाषणास सुरुवात केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीमुळे मध्ये उभा करण्यात आलेले पोलिस उपमुख्यालय, बारामती शहर पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, बारामती बस स्थानक या अत्याधुनिक व सुसज्ज इमारती पाहिल्यानंतर या इमारती शासकीय इमारती न वाटता एखाद्या कार्पोरेट कंपन्यांची ऑफिसेस पेक्षाही अत्याधुनिक असल्याचा भास होतो, त्यामुळे राज्यातील इतर गृह खात्याच्या इमारती बांधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पीएमसी म्हणून नियुक्त करावं, त्यावेळी अजितदादा मला म्हणतील, मला पीएमसी कशाला?, गृह खातेच मला द्या, मात्र मी माझे गृह खाते देणार नाही. या गृह खात्याच्या सुसज्ज इमारतींसाठी इमारतीसाठी अजितदादांची मदत घेऊ, अशी टिपण्णी केली.