
Satara News, Baudhan, Udayanraje Bhosale, Mining Protest, Wai Taluka,
बावधन, नागेवाडी, दरेवाडी, कनूर, अनपटवाडी, म्हातेकरवाडी, वाघजाईवाडी, पांढरेचीवाडी, शेलारवाडी आणि व्याजवाडी परिसरातील ग्रामस्थ या बैठकीस उपस्थित होते. यावेळी अनेक शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत खाण-क्रशर प्रकल्पाबाबत असलेल्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सन २०२२ मध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर असलेल्या जमिनीलगतची मोजणी करण्यात आली. ही मोजणी करताना लगतच्या जमीनमालकांना पुरेशी माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच बावधन, अनपटवाडी आणि वाघजाईवाडी ग्रामपंचायतींनी खाण-क्रशरला विरोध करणारे ग्रामसभेचे ठराव केले असतानाही पुढील प्रक्रिया सुरू झाल्याबद्दल ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले.
मोजणी प्रक्रियेबाबतही काही शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे हरकती नोंदविल्या असून, मोजणीची फेरतपासणी करण्याची मागणी करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान परिसरातील ग्रामस्थांचा विरोध असल्यास खाण सुरू केली जाणार नाही, असा शब्द खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला होता, असा दावा यावेळी ग्रामस्थांनी केला. मात्र, त्यानंतरही प्रकल्पाबाबत हालचाली सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रश्नावर मागील दहा दिवसांपासून काही तरुण शेतकरी वाई तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याचे सांगत प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन तोडगा काढावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला
खाण-क्रशर सुरू झाल्यास परिसरातील शेती, पाण्याचे स्रोत, जमिनीची सुपीकता, रस्त्यांवरील वाहतूक आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे संबंधित प्रशासनाने सर्व बाबींचा विचार करून ग्रामस्थांची भूमिका जाणून घ्यावी आणि प्रकल्पाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, खाण-क्रशरला परवानगी देण्याची प्रक्रिया पुढे गेल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. गरज पडल्यास मुंबईतील मंत्रालयापर्यंत मोर्चा काढून आंदोलन करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.