प्रो कबड्डी लीग स्पर्धेत बंगाल वॉरियर्सची बंगळुरू बुल्सवर मात
पुणे : अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत सामन्यावर नियंत्रण ठेवीत बंगाल वॉरियर्स संघाने बंगळुरू बुल्स संघावर ४४-२९ अशी मात केली आणि प्ले ऑफच्या आशा कायम ठेवल्या. पूर्वार्धात बंगाल संघाकडे २२-१२ आघाडी होती.
बंगाल वॉरियर्सची बंगळुरूवर मात
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आघाडी घेणे आणि ती टिकवणे हे कोणत्याही खेळामध्ये महत्त्वाचे असते. बंगाल वॉरियर्स संघाने बंगळुरू बुल्स विरुद्ध हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवत सुरुवातीपासून रणनीती अमलात आणली. सुरुवातीपासून आघाडी घेत त्यांनी सामन्याच्या पंधराव्या मिनिटाला पहिला लोण नोंदविला. मध्यंतराला त्यांनी २२-१२ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती.
बंगालच्या खेळाडूंचे सुरुवातीपासूनच खेळावर नियंत्रण
उत्तरार्धातही बंगालच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच खेळावर नियंत्रण मिळवले होते सामन्याच्या २८ व्या मिनिटाला त्यांनी आणखी एक लोण नोंदवित ३३-१९ अशी आघाडी मिळविली. शेवटची चार मिनिटे बाकी असताना बंगाल संघाकडे ३९-२६ अशी मोठी आघाडी होती. त्यामध्ये प्रणय माने व एस. विश्वास यांनी केलेल्या खोलवर चढायांचा मोठा वाटा होता. कर्णधार फाजल अत्राचेली याने उत्कृष्ट पकडी करीत संघाच्या विजयाला हातभार लावला.बंगळुरू संघाच्या परदीप नरवाल याने एकतर्फी लढत दिली.