bharat gogawale as Guardian Minister of Raigad
रायगड : राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होऊन अर्धे वर्षे झाले तरी देखील पालकमंत्रिपदाचे अजूनही घोंगडे भिजत आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन महायुतीच्या नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरु आहे. रायगडमध्ये शिंदे गटाचे नेते भरत गोगावले आणि अजित पवार गटाच्या नेत्या आदिती तटकरे यांच्यामध्ये पालकमंत्रिपदाची रस्सीखेच सुरु आहे. यावरुन आता भरत गोगावले यांच्यासाठी शिंदे गटातील नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफारस केली आहे.
शिंदे गटाचे नेते व मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त रायगडमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शिंदे गटाचे नेते तथा राज्यमंत्री योगेश कदम हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी भर सभेत भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रिपद देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी भाषण करून पुन्हा एकदा पालकमंत्रिपदाच्या मुद्द्याला हात घातला आहे. यावेळी योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफारस केली असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेत योगेश कदम यांनी भाषण केले. आपल्या याच भाषणादरम्यान त्यांनी रायगडचे पालकमंत्रिपद हे भरतशेठ गोगावले यांना मिळायला हवे, अशी जाहीर इच्छा व्यक्त केली. तसेच मी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफारस केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या जाहीर भाष्यामुळे आता राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार सुनील तटकरे आणि भरतसेठ गोगावले यांच्यात नव्याने पालकमंत्रिपदासाठी चढाओढ रंगण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांना मी सूचवले…
पुढे योगेश कदम म्हणाले की, आमची देखील इच्छा होती की भरतशेठ हे पालकमंत्री झाले पाहिजे. भरतशेठ गोगावले यांना मंत्रिपद देण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपदाच्या रुपात भेट द्या असे एकनाथ शिंदे यांना मी सूचवले आहे. रामदास कदम यांनीदेखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे, अशी माहितीही योगेश कदम यांनी दिली. तसेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भरत गोगावले यांनाच दिले पाहिजे, अशी मोठी मागणी योगेश कदम यांनी केली. यामुळे आता रायगडच्या पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रायगडसह नाशिकमध्ये देखील पालकमंत्रिपदाचा मुद्दा चर्चेत आला आहे. नाशिकमध्ये भाजप नेते गिरीश महाजन तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. कृषीमंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे सातत्याने शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधाने करत असल्यामुळे ते चर्चेत आहेत. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांना देखील मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदाची लढाई आता तिहेरी झाली आहे.