शरद पवार आणि अजित पवार पुण्यात साखर संकुलमध्ये बंद दाराआड चर्चा झाली (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका रंगणार आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्णय दिल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये हालचालींना वेग आला आहे. आगामी मुंबई-पुणे महापालिकांसह इतर पालिका आणि जिल्हापरिषदांच्या निवडणूकांमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, राज्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. त्याचसोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची देखील युतीची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता अजित पवार व शरद पवार यांची बंद दाराआड चर्चा झाली आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जेष्ठ नेते शरद पवार यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथे असणाऱ्या साखर संकुल येथे दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. यावेळी शरद पवार गटाचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील आणि बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती. यावेळी शरद पवार आणि अजित पवार हे शेजारी शेजारी बसले होते. त्यामुळे पवार काका-पुतण्यामधील मनभेद आता दूर होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना तटकरे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावर सुनील तटकरे म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र याबाबत काही निर्णय घ्यायचा असेल तर तो शरद पवार आणि अजित पवार हे दोन नेतेच घेऊ शकतात. असं सुनील तटकरेंनी म्हटलं आहे. त्याचबरोबर यापूर्वी शरद पवार यांना राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर हा निर्णय सुप्रिया सुळे घेणार असल्याचे म्हणत त्यांनी सूचक वक्तव्य केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत दोन ते तीन दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे मनोमिलन होण्याबाबत प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, एकत्र येण्याबाबत काही चर्चा व्हायची असेल तर ती माझ्यात आणि अजित पवारांमध्ये होईल. पण अजित पवारांनी या बाबत आधीच सांगितलं आहे की अशा काही शक्यता नाहीत. त्यामुळे मी देखील तेच सांगेन. बाकी पक्ष एकत्र येतील अशा ज्या चर्चा चालल्या आहेत त्या हवेतल्या गप्पा आहेत.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. यानंतर आता अजित पवार व शरद पवार यांच्यामध्ये पुण्यात चर्चा झाल्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत.