बुलढाणा : सर्वत्र नववर्षाचं स्वागत जल्लोषात आंनदात सुरू होत असताना दुसरीकडे बुलढाण्यात वर्षाच्या शेवटच्या रात्री भीषण अपघात झाला आहे. मद्यधुंद कारचालकाने सुसाट कार चालवत दुचाकीसह ३ ते ४ वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात ४ जण जखमी झाले आहेत.
जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. त्यांना उपचारासाठी शेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. थरकाप उडवणारी ही घटना शेगाव -बाळापूर मार्गावर रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कारमधून ४ तरुण प्रवास करीत होते. कारचालक हा दारुच्या नशेत गाडी चालवत होता. शेगाव -बाळापूर मार्गावर कार आली असता, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. क्षणार्धात कार समोरुन जात असलेल्या दुचाकीसह ३ ते ४ वाहनांना धडकली.
अपघात इतका भीषण होता, की वाहनांना धडक दिल्यानंतर कार डिव्हाडरवर चढून रस्त्याच्या कडेला उलटली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातात ४ जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी शेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री उशीरापर्यंत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Web Title: Big crash on the last night of the year a drunk driver blew up 3 to 4 vehicles including a two wheeler nrdm