
पुणे : कसबा विधानसभा (Kasba Peth Bypoll) मतदारसंघातील मतदान संपले. पहिल्या टप्प्यात मतदारांचा पोटनिवडणुकीमधील निरुत्साह दिसून आला होता. पण सायंकाळी पाचपर्यंत कसबा पेठेत 45.25 टक्के मतदान झाले. भाजपचे माजी नगरसेवक गणेश बीडकर यांनी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर हल्ला केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
कसबा मतदारसंघातील माल धक्का चौकातील अशोक कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. गणेश बीडकर भाजप कार्यकर्त्यांसह याठिकाणी पैसे वाटप करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. तिथेच कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. याविरोधात कार्यकर्ते समर्थ पोलीस स्टेशनला जमा झाले होते. कसबा पेठ पोटनिवडणुकीत पैशांचे पाकीट न घेतल्याच्या कारणावरुन भाजपचे माजी नगरसेवक व त्यांच्या साथीदारांनी एका कुटुंबाला बेदम मारहाण केली. यावरुन गंजपेठेत शनिवारी रात्री जोरदार राडाही झाला होता. मध्यरात्रीपर्यंत दोन्ही गटातील लोक गंजपेठ पोलीस चौकीसमोर ठाण मांडून बसले होते. पोलिसांनी दोन्ही गटातील 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल केला.
याबाबत नीता किशन शिंदे (वय 42, रा. गंज पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विष्णु हरीहर, निर्मल हरीहर, हीरा हरीहर व इतर 15 ते 16 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घरी असताना विष्णु हरीहर तसेच इतर लोक आले. फिर्यादी यांनी पैशांचे पाकीट न घेतल्याच्या कारणावरुन त्यांचा भाऊ कुणाल यास धक्काबुक्की केली. तुला लय माज आलाय का, तुझ्या घरी खायला नाही, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली.