
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल, हेक्टरी १ लाख दुष्काळी मदतीची मागणी
ऊसदर निश्चित करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, निवेदने आणि विविध आंदोलने करण्यात आली. जिल्ह्यातील साखर कारखानदारांची प्रत्यक्ष भेट घेऊनही दराबाबत मागणी करण्यात आली. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नावर बैठक बोलावली होती; परंतु एकही साखर कारखानदार उपस्थित न राहिल्याने बैठक निष्फळ ठरली. दोन दिवसांत पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही बैठक न झाल्याने प्रशासन आणि कारखानदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या धर्तीवर धाराशिवमधील सर्व साखर कारखानदारांनी उसाला प्रतिटन चार हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक पहिली उचल द्यावी. तसेच ऊसतोड झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. कारखानदारांनी दर जाहीर करण्यास टाळाटाळ केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यंदा धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढली असून शेतकऱ्यांच्या हातातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२६-२७ चा शंभर टक्के पीकविमा मंजूर करून त्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. तसेच खरीप २०२३-२४ आणि २०२४-२५ मधील प्रलंबित पीकविम्याचे वितरण करावे, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे जनावरांसाठी तातडीने चारा उपलब्ध करून तो चारा छावण्यांमध्ये न देता थेट शेतकऱ्यांच्या दावणीला द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. शेतकरी आर्थिक संकटात असताना केवळ आश्वासनांवर त्यांची बोळवण करू नये, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.
वारंवार निवेदने देऊनही ऊसदर, पीकविमा आणि दुष्काळी मदतीबाबत प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. १६ नोव्हेंबरपासून येडशी टोलनाक्यावर बेमुदत रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येईल. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष रविंद्र भीमाशंकर इंगळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
KDMC तील स्वीकृत नगरसेवक निवडीचा तिढा कायम; ठाकरे गट आक्रमक, शहरातील १० ठिकाणी आंदोलनाचा इशारा!
Ans: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल देण्याची मागणी संघटनेने केली आहे.
Ans: दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
Ans: मागण्या मान्य न झाल्यास १६ नोव्हेंबरपासून येडशी टोलनाक्यावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.